आपले सरकार’ केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट इशारा – जादा पैसे घेतले, की परवाना रद्द!” 🚨

शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा एक रुपयाही जास्त घेतला, तर थेट परवाना रद्द – असा इशारा हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केंद्र चालकांना शनिवारी (ता. 9) दिला.
शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक आपले सरकार सेवा केंद्रांवर लाभार्थ्यांकडून जादा रक्कम उकळली जात असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचल्या होत्या. यासोबतच, लाभार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था नसल्याने विशेषतः महिला वर्गाला प्रचंड त्रास होत असल्याचेही उघड झाले.
💥 सुट्टीच्या दिवशीच जिल्हाधिकाऱ्यांची धडक तपासणी
सुट्टीचा दिवस असूनही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सकाळपासूनच हिंगोली शहर व तालुक्यातील आपले सरकार केंद्रांवर अचानक धडक तपासणी केली.
तपासणीत बहुतांश ठिकाणी पिण्याचे पाणी व बसण्याची सुविधा नसल्याचे समोर आले. अनेक केंद्रांवर प्रमाणपत्रासाठी किती शुल्क आकारायचे, याचा फलकसुद्धा लावलेला नव्हता – ज्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत होती.
⚡ जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा
पुढील ७ दिवसांत सर्व केंद्रांवर पिण्याचे पाणी व बसण्याची सुविधा द्या.
प्रत्येक केंद्रावर शुल्काचा फलक लावा.
शासनाने ठरवलेल्या शुल्काप्रमाणेच पैसे घ्या.
जादा रक्कम घेतल्यास तात्काळ परवाना रद्द.
मंजूर जागेऐवजी इतरत्र चालणारी केंद्रे तातडीने बंद करा, अन्यथा कारवाई.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “लाभार्थ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही. ज्यांना नियम पाळता येत नाही, त्यांनी केंद्र चालवूच नये.”
या तपासणीत उमाकांत मोकरे उपस्थित होते.
आता पाहावे लागेल की जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याने ‘जादा वसुली’ करणाऱ्या केंद्रांचा चेहरा खरोखर बदलतो की कारवाईचा फटका बसतो.
.