महाराष्ट्र

मुंबई मनपा निवडणुकीत ठाकरे बंधूंना पराभव पहावा लागेल:मराठी माणसांना आकर्षित करण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरतील, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा दावा

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटले की, उद्धव आणि राज ठाकरे यांचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. कदम यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कालावधीवर टीका केली. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील मराठी माणसांसाठी काहीही करू शकले नाहीत. उलट, एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न सोडवला आणि गिरणी कामगारांचे प्रश्न मार्गी लावले. मंत्रिमंडळातील कामकाजाबद्दल बोलताना कदम यांनी स्पष्ट केले की, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये कोणताही संघर्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामासाठी पूर्ण मोकळीक दिली आहे. त्यांनी डान्सबारच्या आरोपांवरही स्पष्टीकरण दिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, हॉटेल केवळ भाड्याने दिले होते आणि भाडेकरूच्या व्यवसायाशी त्यांचा काहीही संबंध नाही. कदम यांनी सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर उपाययोजनांची माहिती दिली. अन्न व औषध प्रशासन विभागात 374 नवीन अन्न निरीक्षकांची भरती झाली असून, प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अन्न निरीक्षक कार्यरत राहणार आहेत. दोन नवीन प्रयोगशाळांनाही मंजुरी मिळाली असून, जुन्या प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण सुरू आहे. पोलिस आयुक्तांना कारवाईचे निर्देश पुण्याच्या गणेशोत्सवात महिला पत्रकाराचा विनयभंग आणि छायाचित्रकारांशी झालेले गैरवर्तन या घटना गंभीर स्वरूपाच्या असून पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश देणार असल्याचे कदम यांनी कार्यक्रमात जाहीर केले. पत्रकार समाजाच्या हितासाठी काम करत असतो. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले व चुकीच्या घटनांवर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button