महाराष्ट्र

वर्षातून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी:पैलवान चंद्रहार पाटलांची मागणी, अन्यथा आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा

महाराष्ट्र केसरी किताबाची किंमत कमी होत असल्याबद्दल दुहेरी महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी चिंता व्यक्त केली आहे. कुस्तीगीर संघटनांमधील मतभेद, श्रेयाची लढाई आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षाला तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केल्या जातात, ज्यामुळे या प्रतिष्ठित किताबाची प्रतिष्ठा घटत आहे, असे पाटील यांचे म्हणणे आहे. यावर तोडगा काढण्यासाठी वर्षातून केवळ एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करावी, या मागणीसाठी ते लवकरच आझाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पै. चंद्रहार पाटील म्हणाले, राज्यात 1960 पासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील सर्वोच्च मानाची एकमेव स्पर्धा घेतली जात होती. मात्र अलीकडे संघटनांमधील मतभेद, श्रेयवाद आणि राजकीय हस्तक्षेपामुळे वर्षभरा त तीन ते चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत असून त्यामुळे कुस्तीगिरांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होते. शिवाय केसरी किताबाची किंमत घटत आहे. पुढे बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, तसेच अनेक स्पर्धा झाल्यामुळे खरा महाराष्ट्र केसरी कोण हेच लोकांना समजेनासे झाले आहे. गतवर्षी निवडणुका असल्याने 2024 मधील स्पर्धा पुढे ढकलली. परिणामी 2025 मध्ये दोन स्पर्धा झाल्या आणि नोव्हेंबरमध्ये पुन्हा दोन स्पर्धा होणार आहेत. आता आणखी एक संघटना उदयास आल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत एका वर्षात चार ते पाच महाराष्ट्र केसरी निर्माण होणार आहेत. वास्तविक प्रत्येक महाराष्ट्र केसरीला शासनाकडून पेन्शन आणि अन्य सुविधा दिल्या जातात. मग एका वर्षाला अनेक महाराष्ट्र केसरी असतील तर शासन कोणाला खरा महाराष्ट्र केसरी मानणार? ही जबाबदारी शासनाची आहे. लवकर निर्णय न घेतल्यास आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा चंद्रहार पाटलांनी दिला आहे. या मागणीसाठी यापूर्वी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण केले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशी मागणी केली होती. मात्र ती अद्याप मान्य न झाल्याने व तोडगा न निघाल्यामुळे उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आमचा कोणत्याही कुस्तीगीर संघटनेला विरोध नाही, मात्र दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे, असेही पाटील यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button