ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला:ओबीसी आरक्षणात आमचे स्थान मिळवूनच राहू, भुजबळांच्या टीकेला मनोज जरांगेंचा पलटवार

मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत आज पुन्हा एकदा सरकारच्या शासन निर्णयावर तसेच मराठा आरक्षणावर भाष्य करत टीका केली आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रत्युत्तर देत टीका केली आहे. ओबीसी समाजाला एक दुष्ट विचारांचा नेता मिळाला आहे, जो आपल्या स्वार्थासाठी इतरांना वेगळे आमिष दाखवून कामाला लावतो, अशा शब्दांत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील म्हणाले, भुजबळ यांना सर्व काही आपल्या मनाप्रमाणे चालले पाहिजे असे वाटते. मात्र, आपण सर्व लोकशाही मार्गाने आपले हक्क मिळवणार आहोत, असे जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितले. तुला जे काही करायचे आहे ते कर, आम्ही आमच्या मार्गाने ओबीसी आरक्षणात आमचे स्थान मिळवूनच राहू, असे थेट आव्हान जरांगे यांनी भुजबळ यांना दिले. आम्ही आधीपासूनच कुणबी आणि ओबीसीच्या यादीत समाविष्ट आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तू काय कमी पुढारलेला आहेस का? मराठा समाज पुढारलेला आहे, तो मागस नाही असे भुजबळ म्हणाले होते, त्यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, तू काय कमी पुढारलेला आहेस का? तुझ्या प्रत्येक गावात जमिनी आहेत. भुजबळांनी गोरगरीब ओबीसींना वेड्यात काढले आहे. तुला रस्त्यावर उतरु नको केव्हा म्हटले, तुला जिंदगीत दुसरे काय आले? असा सवाल जरांगेंनी केला. तसेच सरकारने भुजबळांवर गुन्हा दाखल केला पाहिजे, तू म्हणजे मंत्रिमंडळ आहे का? असेही जरांगे यांनी म्हटले. तुमच्यासारखा मी जाती वादी नाही पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, वाद लावण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी हा कुटाने करतो. ओबीसींनी शहाणे व्हावे, याच्या नादी लागून ओबीसींचे वाटोळे करू नये. त्यांना जर आम्हाला चॅलेंज केले तर 1994 चा जीआर आम्ही चॅलेंज करणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. आम्ही म्हटले का ओबीसी महामंडळाला महाज्योती का दिले म्हणून? तुमच्यासारखा मी जाती वादी नाही. तुम्ही उपसमिती बोलावली त्यात एकही मराठा नाही. सरळ सरळ जातीवाद आहे हे तुम्हाला दिसले का? असेही जरांगे म्हणाले. काय म्हणाले होते छगन भुजबळ? छगन भुजबळ पत्रकार परिषद घेत म्हणाले, मराठा म्हणून सुद्धा आणि कुणबी म्हणून सुद्धा हा समाज ओबीसीमध्ये येऊ शकत नाही. तीन आयोगांनी देखील हा मुद्दा फेटाळून लावला आहे. काका कालेलकर आयोगाने देखील 1955 सालीच सांगितले होते की मराठा समाजाला मागास प्रवर्गात घेता येणार नाही, त्यांना मागास म्हणता येणार नाही. मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले काही केंद्रात गेले, त्यांनी सुद्धा मराठा समाजाला मागास ठरवले नाही. पात्र हा शब्द काढला, यावरुन काय समजायचे? छगन भुजबळ म्हणाले की, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो. त्यांचा हेतू चांगला असेल, त्यांचा अभ्यास आहे. पण ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झाले आहे. त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहोत. ते बोलले हे अडचणीचे झालेले आहे. पहिल्या जीआरमध्ये मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा उल्लेख होता. जरांगे यांनी नंतर त्यांना सांगितले आणि पात्र हा शब्द काढला. यावरुन काय समजायचे? पुढे असे म्हटले की, नातेवाईक आणि नातेसंबंध यात फरक आहे. नाते सबंध म्हणजे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वाचा सविस्तर