लाच घेताना महिला पोलिस हवालदार जाळ्यात:कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात अटक टाळण्यासाठी 20 हजारांची मागणी, एसीबीने केली अटक

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या तक्रारदार व त्याचे इतर तीन नातेवाईक यांना अटक न करण्यासाठी बारामती पोलिस ठाण्यातील महिला पोलिस हवालदार यांनी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २० हजार रुपयांची लाच स्विकारत असताना सदर पोलिस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथक (एसीबी)ने सापळा रचून अटक केली आहे. अंजना बिभीषण नागरगोजे (वय- ३८,रा.बारामती,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिला पोलिस हवालदाराचे नाव आहे. यााबत बारामती पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिस हवालदार अंजना नागरगोजे यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी, सासू -सासरे व मेहुणा यांचे विरोधात त्यांच्या मेहुण्याचे पत्नीने बारामती पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या गुन्हयात तक्रारदार यांना महिला पोलिस हवालदार अंजना नागरगोजे यांनी तक्रारदार व त्यांचे तीन इतर नातेवाईक यांना गेट जामीन देऊन अटक न करण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदार यांची पत्नी व त्यांचे सासू सासरे या चार आरोपींसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण २० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे फोनद्वारे माहिती देत तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीचे पथकाने बारामती येथे जाऊन समक्ष भेटून पडताळणी कारवाई केली. त्यावेळी पोलिस हवालदार नागरगोजे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीचे पथकाने सापळा रचून आरोपीस रंगेहाथ पकडले आहे. एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली संबंधित कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.