वाहतूक नियंत्रणाचे नेमलेले चौक सोडून अन्यत्र कारवाई:पुण्यात तीन वाहतूक पोलिसांना दीड हजार रुपयांचा दंड

पुणे शहरातील टिळक रस्त्यावर नेमून दिलेल्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण न करता पूरम चौकात एकत्र येऊन कारवाई करणाऱ्या तीन वाहतूक पोलिसांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी या प्रकरणी दंडाचे आदेश दिले. खडक वाहतूक विभागातील पोलीस हवालदार संतोष यादव, पोलीस शिपाई बालाजी पवार आणि मोनिका करंजकर-लांघे यांना १५ मे रोजी वेगवेगळ्या चौकांवर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली होती. संतोष यादव यांना स. प. महाविद्यालय चौक, बालाजी पवार यांना हिराबाग चौक आणि मोनिका करंजकर यांना भावे चौक येथे नियुक्त करण्यात आले होते. मात्र, तिघेही आपापल्या नेमून दिलेल्या जागी न राहता टिळक रस्त्यावरील पूरम चौकात एकत्र आले. तेथे त्यांनी वाहतूक नियंत्रणाऐवजी वाहने थांबवून कारवाई करताना आढळले. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी तिघांना निलंबित केले होते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना प्रथम पाच हजार रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली. त्यावर त्यांनी दिलेला खुलासा अंशतः समाधानकारक असल्याने दंडाची रक्कम दीड हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली. ४३ निलंबित कर्मचारी पु्न्हा सेवेत पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसुरी केल्याबद्दल सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनाबाबतचा आढावा नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ४३ पोलीस कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. खडक वाहतूक शाखेतून निलंबित करण्यात आलेले पोलीस हवालदार यादव, पवार आणि करंजकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्यात आली. त्यांची पोलीस मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.