पीएमपीएमएलची शववाहिका सेवा बंद:सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पीएमपीएमएल अध्यक्षांना भेटले

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात कामगार संघटनेच्या पदाधिकारी व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाच्या शिष्टमंडळाने बुधवारी पीएमपीएमएलचे अध्यक्ष एस देवरे यांची भेट घेतली. गेल्या ४० वर्षांपासून पीएमपीएमएलच्या वतीने सुरू असलेली “पुष्पक वाहिनी” ही शववाहीकेची सेवा अचानक बंद करण्यात आली आहे. पुणेकरांच्या दुःखाच्या प्रसंगाला धावून येणारी ही सेवा अचानक बंद करण्यात आली ही बाब दुर्दैवी आहे. तातडीने ही सेवा पूर्ववत सुरू करावी अन्यथा अंत्ययात्रा घेऊन पीएमपीएमएलच्या स्वारगेट, पुणे येथील मुख्य कार्यालयावर मोर्चा आणण्यात येईल असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात बसेस रस्त्यावर आणाव्यात अशीही सुप्रिया सुळे यांनी मागणी केली. गेल्या अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या “पीएमपीएमएल”च्या अनेक कर्मचाऱ्यांना अजूनही सेवेत कायम करण्यात आलेले नाही, या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे, तसेच या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम व त्यांच्या निवृत्तीवेतनाची रक्कम अदा करण्यात यावी अशीही कामगार संघटनेच्या वतीने मागणी मांडली. पीएमपीएमएल च्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर याबाबत उचित कार्यवाही होईल ही अपेक्षा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सूळे, प्रशांत जगताप, विशाल तांबे, सचिन दोडके, शिवाजीराव खटकाळे, सुनिल नलावडे, अनिता इंगळे आदि मान्यवर उपास्थित होते.