मारबत निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्पचा बडग्या:लव्ह जिहाद, ऑपरेशन सिंदूर, महागाई, भ्रष्टाचार आदी विषयांवरील बडगेही आकर्षणाचे केंद्र

नागपुरात शनिवारी मारबत व बडग्यांची मिरवणूक काढण्यात आली. यात बडग्यांसह काळी व पिवळी मारबत आकर्षणाचे केंद्र होते. ‘मारबत व बडग्या’ हा जगातला एकमेव असा मिरवणूक प्रकार फक्त नागपुरातच आहे. हा उत्सव यंदा विशेष गाजला. डोनाल्ड ट्रम्प, लव्ह जिहाद, दहशतवाद, महागाई, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता आदी विषयांवर निघालेल्या बडग्यांनी लक्ष वेधून घेतले. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणारी मारबतींची मिरवणूक संपूर्ण देशभरात नागपुरातच निघते. काळी आणि पिवळी मारबतीसह अलिकडे लाल मारबतही निघते. मारबत म्हणजे समाजातील वाईट रूढी, अंधश्रद्धा, आणि अनिष्ट प्रथांचे प्रतीक आहे. मारबत व बडग्यांच्या पुतळ्यांचे दहन करून समाजात चांगल्या विचारांचे स्वागत करणे हा मुख्य उद्देश असतो. काळी मारबत ही कृष्णाच्या वधासाठी आलेल्या पुतना मावशीचे प्रतीक मानली जाते. तर पिवळी मारबत ही लोकांचे रक्षण करणारी देवी म्हणून ओळखली जाते. जागनाथ बुधवारी येथून तऱ्हाने तेली समाजाच्या पिवळी तर बारदाणा मार्केट येथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. इतवारीतील नेहरू पुतळा चौकात दोन्ही मारबतींचे मीलन झाले. शहीद चौक, खुळे चौक, गांधी पुतळा चौक, बडकस चौक, कोतवाली, गांधीगेट, चिटणीस पार्क मार्गे मिरवणूक फिरली. मारबतींचे दर्शन घेण्यासाठी आणि मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. मिरवणुक पाहाण्यासाठी महाल परिसर गर्दीने फुलून गेला होता. रस्त्याच्या दुतर्फा व रस्त्याला लागून असलेल्या इमारतींवर लोक दाटीवाटीने उभे होते. अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त होता. सुमारे तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. तर मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. समाजातील अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्याच्या हेतूने तान्हा पोळ्याच्या दिवशी ही मिरवणूक काढण्यात आली. मारबत आणि बडग्याच्या मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर यथार्थ टीका करण्यात आली. काळ्या मारबतीला १४४ वर्षांंचा, तर पिवळ्या मारबतीला १४० वर्षांंचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाच वेळी निघाल्या. “महागाईच्या राक्षसाचा वध करा’, “पिवळी मारबत बोलते, शहराची स्वच्छता करा’, “भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता सोडणार नाही’, “वाहतुकीचा गोंधळ थांबवा, नागरिकांना दिलासा द्या’, “पाणी इंचाईवर उपाय करा, नाहीतर जनता सवाल करेल’ अशा घोषणा मिरवणुकीत देण्यात आल्या.