महाराष्ट्र

डॉ. ज्योती रहाळकर यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन:’गजानना तू’ काव्यसंग्रह आणि ‘कबीर वाणी’ पुस्तिकेचे स्मिता महाजन यांच्या हस्ते लोकार्पण

‘गजानना तू’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत शास्त्र आणि कला यांची उत्तम सांगड साधली आहे. तत्त्वज्ञान, पंचमहाभुते, निसर्गाची महती या विषयीचा सांगोपांग विचार संवेदनशील मनाच्या कवयित्रीने मांडला आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेला गेयता, मधुर शब्द लाभले असून त्या सादरीकरणासाठी देखील पोषक आहेत, असे विचार ज्येष्ठ नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी व्यक्त केले. सिग्नेट प्रकाशनतर्फे डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘गजानना तू’ या कविता संग्रहाचे आणि ‘कबीर वाणी’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी स्मिता महाजन आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महाजन बोलत होत्या. डॉ. जयेश रहाळकर मंचावर होते. स्मिता महाजन पुढे म्हणाल्या, डॉ. ज्योती रहाळकर यांचे व्यक्तिमत्व अत्यंत गुणी असून त्यांच्या मनात येणारे तरल, संवेदनाक्षम विचार त्या कवितेतून प्रकट करीत असतात. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, स्वत:ला आनंदीत ठेवण्यासाठी तसेच वेगळेपण दर्शविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सतत काहीतरी कर्म करत राहणे आवश्यक आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांची बैठक वाङ्‌मयीन विचारांची व अभ्यासाची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. लेखनाविषयी बोलताना डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, मी गेली अनेक वर्षे प्रसंगानुरूप काव्य करत आहे. माझ्या हातून अनेक पुस्तकांचे अनुवाद घडले आहेत. गणेशोत्सवानिमित्त मी केलेल्या गणेशावरील कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्याचा योग जुळून आला आहे. मला आजेसासुबाईंचा लाभलेला मऊ सहवास स्मरणात ठेवून त्यांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पण करीत आहे. सुरुवातीस ऋचा खरे यांनी भरतनाट्यम्‌ नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button