पुण्यात ‘भूछत्र’ कादंबरीचे प्रकाशन:आजच्या तरुणांना अनुकरण करण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्त्वे नाहीत – सुबोध भावे

प्रत्येक काळ हा त्याची – त्याची गणिते घेऊन येत असतो. अगदी शंभर, दीडशे वर्षांपूर्वी महात्मा गांधी, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही काही लोक हे भूछत्रा सारखे विचार न करणारे किंवा गोंधळलेले असतील.परंतु अशा लोकांना आपल्या महापुरुषांनी दिशा दिली हे निश्चित.भूछत्र हा काळा – काळाचा परिणाम असतो.समाजात आजच्या युवा पिढीने कुणाला आदर्श मानावे, कुणाच्या विचारांचे अनुकरण करावे अशी आदर्श व्यक्तिमत्वे दिसत नाहीत,हे प्रकर्षाने जाणवते, असे मत अभिनेते – दिग्दर्शक सुबोध भावे यांनी व्यक्त केले. एम.ई.एस. भावे प्राथमिक शाळा सभागृह येथे मिहाना पब्लिकेशन्स प्रकाशित अभय अरुण इनामदार लिखित ‘भूछत्र’ या कादंबरीचे प्रकाशन सुबोध भावे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्ष संपादक आणि लेखिका डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, लेखक अभय अरुण इनामदार आणि अमृता कुलकर्णी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना सुबोध भावे म्हणाले की,आपल्या भोवती असे अनेक लोक असतात की,ज्यांच्याकडे अमाप पैसा असतो मात्र ते आनंदी नसतात. तू हे करू नको – ते करू नको असे सांगत समाज कुठेतरी आपल्यातला आनंद हिरावून घेतो आहे असे दिसते. तुमच्या आयुष्यात आनंद कोणत्या गोष्टीने येतो याचा विचार समाज करत नाही, म्हणून आनंद शोधणारे आणि विचार करणारे लोक कदाचित समाजाला भुछत्र वाटतात. मात्र माणसाच्या जगण्यात आणि यशात आनंद महत्वाचा असतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे. ‘हाती घ्याल ते तडीस न्या’ हे आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे, आमच्या शाळेतून बाहेर पडलेले कुणीही बेरोजगार नाही हे अभिमानाने आम्हाला सांगता येते. आज एका वर्गमित्रांची कादंबरी येते आहे, याचा आनंद आहे. ‘भूछत्र’ ही वाचकाला आपली कथा वाटणार आहे, ही कथा एका ध्यासाचा, शोधाचा प्रवास आहे. माणसाचा प्रवास निरंतर सुरू असतो. काही लोक त्याचा बाऊ करतात तर काही लोक त्याचा तटस्थपणे विचार करतात, असेही भावे यांनी नमूद केले. डॉ. वंदना बोकील कुलकर्णी म्हणाल्या की, कथा, कादंबरी सारख्या ठेहराव असलेल्या साहित्य प्रकाराला मधल्या काळात फार लोक हात लावताना दिसत नव्हते. परंतु अलीकडे या साहित्य प्रकारातील लेखक वाढत आहेत, ही चांगली बाब आहे. ‘भूछत्र’ या कादंबरीतील एक २२ वर्षांचा तरुण त्याच्या नजरेतून समाजाकडे बघतो, त्यात काही सकारात्मक बदल घडवू इच्छितो, बदलांची नोंद त्याच्या कुवती प्रमाणे घेतो आणि कुठेही निराश होत नाही ही बाब अत्यंत महत्वाची आहे.