तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करून बदनामी:एक वर्षापासून फरार धुळ्यातील आरोपीला अखेर अटक

एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीला सोशल मिडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करुन, परस्पर तिचे फोटो घेऊन ते मॉर्फ करुन अश्लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी करणाऱ्या आरोपीला बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. यापूर्वी देखील अशाच गुन्ह्यात अटक झाल्याने आरोपीने मागील एक वर्षापासून वेगवेगळया गोष्टीचा वापर करुन तरुणीला त्रास देत पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पारंपारिक पध्दतीने तपास करत आरोपीला अखेर जेरबंद केले आहे. रोहित महेंद्र तितरे ऊर्फ नायक (वय- २७,रा. मैदाने, पो.बोदगाव, ता.साक्री, धुळे ) असे अटक आरोपीचे नाव आहे. बाणेर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत म्हणाले, याबाबत आरोपीवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा मागील वर्षी दाखल झाला होता. आरोपी रोहित तितरे याने सोशल मीडियावरून पीडितेचा फोटो प्राप्त करुन पीडितेच्या नावाने बनावट सोशल मीडिया खाते तयार केले होते. सदर सोशल मीडिया खात्यावर पीडितेचा मोबाईल नंबर टाकून पीडिता ही वेश्याव्यवसाय करते असे नमूद केले. तिला अश्लील व घाणेरडे मेसेज टाकून तिची बदनामी केली. पीडितेचा नंबर सोशल मीडियावर टाकल्याने तिला विविध क्रमांकावरुन सतत काॅल येऊन त्याचा मानसिक त्रास तिला झाला. समाजात व नातेवाईकांत तीची बदनामी झाली व आरोपीच्या कृत्यामुळे तिचे जीवन जगणे देखील अडचणीचे झाले. या गुन्ह्यात आरोपीस यापूर्वी देखील अटक होऊन सुध्दा आरोपीने पीडितेचा सोशल मीडियावर छळ करणे एकतर्फी प्रेमातून सुरुच ठेवले होते. आरोपी स्वत:चे अस्तित्व लपविण्यासाठी त्याचे मुळ गावी येत नव्हता, तसेच त्याचे कोणत्याही पत्त्यावर तो जात नव्हता. आरोपीने त्याचेकडील असलेल्या मोबाईल मध्ये सुध्दा दुसऱ्या व्यक्तीचे नावे सिमकार्ड घेऊन तो वापरत होता. आरोपीचा शोधासाठी पोलीस धुळे येथे त्याचे मूळगावी जाऊनही तो मिळून आला नव्हता. परंतु तपासा दरम्यान आरोपी हा चालक असून तो निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचला परंतु तो मिळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी सदर आयडीचे तांत्रिक विश्लेषण व परंपरागत तपास करत आरोपीचा मागोवा घेऊन त्याला वेल्हे ते आळेफाटा दरम्यान मालेगाव पासिंगच्या एका थांबलेल्या ट्रक मधून मध्यरात्री अडीच वाजता अटक करण्यात आली.