बालसाहित्यिक संजय ऐलवाड यांना मिळाला मानाचा पुरस्कार:मराठवाडा साहित्य परिषदेचा पहिला रघुनाथ शिवराम बोरसे बालवाङ्मय पुरस्कार जाहीर

मराठवाडा साहित्य परिषदेने 2025 पासून रघुनाथ शिवराम बोरसे यांच्या नावाने बालवाड्:मय पुरस्कार सुरू केला आहे. या पुरस्काराचे पहिले मानकरी बालसाहित्यिक संजय ऐलवाड हे ठरले आहेत. त्यांच्या ‘झिब्राच्या कथा’ या बाल कथासंग्रहाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 11 हजार रोख, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या 12 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ बाल साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते सायंकाळी 5.30 वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा छ. संभाजीनगर येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या निवड समितीने ‘झिब्राच्या कथा’ या पुस्तकाची पुरस्कारासाठी निवड केली आहे. रवी कोरडे, डॉ. विनोद सिनकर हे निवड समितीचे सदस्य होते. संजय ऐलवाड यांची हातावरचं पोट, घुसमट हे दोन कथासंग्रह, अंतरीच्या कविता हा कवितासंग्रह, मुलाफुलांची गाणी, चिमणी पडली आजारी हे बाल कवितासंग्रह, भित्रा थेंब, बिबट्याचे पिल्लू आणि इतर कथा हे बाल कथासंग्रह, पिंटूची आकाशवारी, वारूळ या बाल कादंबर्या, आरटीओची गुरूकिल्ली आदी पुस्तकांसह 12 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना बाल वाड्:मयासाठी विविध संस्थांचे 25 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.