बंजारा समाजालाही आरक्षण द्यावे:अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, धर्मगुरू जितेंद्र महाराज यांचा हैदराबाद गॅझेटचा दाखला देत इशारा

शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले त्यानुसारच बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण द्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार असल्याचा इशारा बंजारा समाजाचे धर्मगुरु जितेंद्र महाराज (पोहरादेवी) यांनी रविवारी ता. ७ हिंगोली ेयेथे दिला आहे. हिंगोली येथे आयोजित एका बैठकीसाठी जितेंद्र महाराज हिंगोलीत आले होेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संतोष राठोड, रमेश राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण, विजय जाधव, बाळासाहेब राठोड, प्रेमदास आडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना जितेंद्र महाराज म्हणाले की, शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू केले आहे. त्याच गॅझेटीयरमध्ये पान क्रमांक २३ वर बंजारा समाजाचे एसटी आरक्षण नमुद केले आहे. ज्या प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण दिले त्यात धर्तीवर बंजारा समाजालाही एसटी संवर्गातून आरक्षण दिले गेले पाहिजे. या गॅझेटीयर व शासनाच्या निर्णयाचा आमची तज्ञ मंडळी अभ्यास करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षणासाठी सुरवातीच्या टप्प्यात शासनाला निवेदन दिले जाणार आहे. त्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे. यावेळी त्यांच्याकडे आमची मागणी मांडणार आहोत. मात्र त्यानंतरही आमच्या मागणीचा विचार न झाल्यास एकीकडे न्यायालयीन लढाई सुरु केली जाईल तसेच दुसरीकडे रस्त्यावर उतरून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. तेलंगणा, कर्नाटक राज्यात बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण आहे. बंजारा समाजाची आंध्रप्रदेश व महाराष्ट्राची केवळ भौगोलिक रचना बदलली आहे. मात्र सामाजिक, सांस्कृतीक रचना, बोली भाषा सारखीच आहे.त्यामुळे त्याच धर्तीवर आम्ही महाराष्ट्रात एसटी संवर्गातून आरक्षण मागत आहोत. सध्या एसटी संवर्गातील आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण देण्याची आमची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.