मनोज जरांगेंना बैठक घेण्यासाठी आमदार 10-15 लाख रुपये देतात:लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप, अमोल मिटकरींवरही साधला निशाणा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. त्याआधी बीडमध्ये त्यांनी इशारा सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येत आहोत, तेव्हा काय करायचे ते करा, असे म्हणत आव्हान केले आहे. आता मनोज जरांगे यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हके यांनी जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगेंची मतदारसंघात बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10-15 लाख रुपये देतात, असा आरोप हाके यांनी केला आहे. अकोला येथे माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे यांचा मोर्चा हा सरकार पुरस्कृत आहे, मनोज जरांगेंची मतदारसंघात एक बैठक घेण्यासाठी आमदार त्यांना 10 ते 15 लाख रुपये देतात. जरांगेंना आमदार पैसे देतात, यामुळेच मराठवाड्यातल्या छोट्या छोट्या गावातही जरांगेंची मोठमोठी बॅनर्स आणि पोस्टर्स लागल्याचे हाके म्हणाले. आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची पुढे बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची आहे. आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातील कोणत्याच नेतृत्वाकडून आता अपेक्षा नाही. त्यामुळे यासंदर्भात केंद्रातील ओबीसी नेत्यांना साकडे घालणार असल्याचे हाके यांनी सांगितले आहे. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा दरम्यान, यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, मिटकरी हे फार मोठे व्यक्ती नाहीत. अमोल मिटकरी हे अजित पवारांनी विरोधकांवर भुंकण्यासाठी ठेवलेला कुत्रा असल्याचे हाके यांनी म्हटले. तसेच बिग बॉसच्या घरात अमोल मिटकरी चार-पाच तासही टिकणार नाहीत. तिथून बाहेर आल्यानंतर त्यांना काही काम उरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील काही तमाशा मंडळाना आपण त्यांच्यासाठी सोंगाड्या किंवा ढोलकीवाला म्हणून काम देण्यासाठी विनंती करणार असल्याचा टोला हाकेंनी मिटकरींना लगावला.