एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन:ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला, म्हणाले- अदखलपात्र लोक दाखल घ्यायला लागले

गणेश चतुर्थीच्या निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे प्रथमच शिवतीर्थावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घ्यायला गेले होते. तसेच दोन्ही नेत्यांच्या कुटुंबीयांनी स्नेहभोजन देखील केले होते. त्यानंतर आज शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जात गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या घरून निघाल्यावर एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले, आज राज ठाकरे यांच्या घरी गणपतीचे दर्शन घ्यायला गेलात तेव्हा काय चर्चा झाली? त्यावर बोलताना शिंदे म्हणाले, अरे बाबा गणपतीचे दर्शन गेल्या वर्षी जसे घेतले तसेच या वर्षी घेतले. गणपती दर्शनाला आलो होतो आणि आता निघालो. आम्ही इथे नेहमीच येतो. यावर्षी काही नवीन लोक पाहिले, आनंद झाला, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, बाप्पाला साकडे घालण्याची आवश्यकता लागत नाही. त्याला सगळे माहीत असते. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर. बळीराजा म्हणजे अन्नदाता म्हणजे शेतकरी याला सुखी ठेव. चांगला पाऊस पडतच आहे, चांगली पिके येऊ दे, उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती-प्रगती होऊ दे. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितले आणि जे कोणी दुखी असतील त्यांना सुखी ठेव अशी प्रार्थना केली. काही राज की बात राजच राहू द्या एकनाथ शिंदे म्हणाले, यात कुठलेही राजकारण आणू नका. काही राज की बात राजच राहू द्या, असे सूचक विधान शिंदे यांनी केले. उद्धव ठाकरे एवढ्या वर्षांनी राज ठाकरे यांच्या घरी आले, यावर प्रश्न विचारला असता शिंदे म्हणाले, आम्ही तर दरवर्षीच येत असतो. आता काही नवीन लोक येत आहेत, चांगले आहे. आणि त्यांच्या भेटीकडे काय बघायचे आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत चांगली गोष्ट आहे. म्हणजे अदखलपात्र दाखल घ्यायला लागले आहेत, चांगली गोष्ट आहे, अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे.