चंद्रपूरात भीषण अपघात:भरधाव ट्रकची रिक्षाला धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू तर तिघे गंभीर जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील कापणगाव येथे ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तिघांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कापणगाव येथे झालेल्या या भीषण अपघातात ऑटो चालक प्रकाश मेश्राम (48, पाचगाव), रवींद्र बोबडे (48, पाचगाव), शंकर पिपरे (50, कोची) आणि वर्षा मांदाडे (50, खामोनी) यांचा मृत्यू झाला आहे. यातील एक प्रवासी किरकोळ जखमी असून त्याच्यावर राजुरा येथे उपचार सुरू आहेत. तर तिघांवर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक हा राजुराकडून खामोनी-पाचगाव येथे जात होता, तर रिक्षा गडचांदूर येथून राजुराच्या दिशेने जात होती. कापणगाव येथे सर्विस रोड वरून हायवे वर रिक्षा येताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये रिक्षा चालक प्रकाश मेश्राम याच्यासह तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याचवेळी इथून जात असलेले राजुर मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी तातडीने अपघातग्रस्तांना मदत दिली. कल्याणमध्ये ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू कल्याण येथील निक्कीनगर परिसरात 23 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला होता. आपल्या मुलाला शाळेत सोडून परत येत असताना दुचाकीस्वार महिलेला भरधाव ट्रकची धडक बसली. यात या महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.