ओबीसी समाजाचा मोर्चाचा निर्णय:हैदराबाद गॅझेटियरचा निर्णय रद्द करण्याची मागणी, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार

हैदराबाद गॅझेटीयर लागू करण्याचा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय ओबीसी समाज बांधवांच्या बैठकीत रविवारी ता. ५ घेण्यात आला आहे. या मोर्चासाठी प्रा.लक्ष्मण हाके यांच्यासह ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे. शासनाने मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटीयर लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याबाबत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे. मात्र शासनाच्या या निर्णयाला ओसीबी समाजाने तिव्र विरोध दर्शविला असून सदर शासन निर्णयाची होळी करून राज्यभरात तिव्र आंदोलन उभारण्याची तयारी चालवली आहे. या पार्श्वभुमीवर कळमनुरीत आज ओबीसी समाज बांधवांची बैठक झाली. यावेळी ॲड. रवी शिंदे, चंदू लव्हाळे, दिनकर कोकरे, राजेंद्र शिखरे, वनीता गुंजकर, नागोराव जांबूतकर, विठ्ठल गाभणे, उमेश गोरे, मारोतराव खांडेकर, उत्तमराव शिंदे, ॲॅड. संतोष राठोड, बालाजी देवकर, गफार कुरेशी, अशोक करे, अतुल बुर्से, आप्पाराव शिंदे, केशव मस्के यांच्यासह समाज बांधवांची उपस्थिती होती. शासनाने हैदराबाद गॅझेटीयर लागू करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आले. शासनाचा हा निर्णय ओबीसींच्या हक्कावर गदा आणणारा निर्णय असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तसेच ५८ लाख प्रमाणपत्रांची चौकशी करावी, न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीसाठी ता. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी कळमनुरी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर प्रा. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चासाठी प्रा. टी. पी. मुंडे, नवनाथ वाघमारे, नवनाथ ससाने यांचीही उपस्थिती राहणार असून यावेळी समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.