सर्वांना मान्य असणारा जीआर काढला तर हा ओबीसींचा वाद का?:छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचा हल्लाबोल

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. तसेच ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यासह पवार कुटुंबावर देखील हल्लाबोल सुरू केला आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलन होणार हे सरकारला तीन महिने आधी माहीत होते. होम डिपार्टमेंटला किती लोक येणार याचा अंदाज होता. आझाद मैदानापर्यंत आंदोलन पोहोचले हे चांगली गोष्ट आहे. आंदोलकांना काही सुविधा मिळाल्या नाहीत हे दुर्दैव आहे. आंदोलन हाताबाहेर गेले हे त्याचेच कारण आहे. कोर्टाने यात लक्ष घातले आणि त्यानंतर समितीने चर्चा करायला सुरुवात केली. लोक येणार होते तर आधीच का तयारी केली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जीआरबद्दल छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का? पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, मुंबईकरांना अडचण होईल आणि त्यावर प्रश्न उपस्थित होऊन मुंबई महापालिकेत भाजपला फायदा होईल असे वातावरण तयार केले गेले. गिरीश महाजन हे समितीत होते, ते ओबीसी नेते आहेत. सर्वांना मान्य असणारा जीआर काढला तर हा ओबीसींचा वाद का? सरकारमध्ये एक मत नाही का? छगन भुजबळ यांना माहिती नव्हती का? लोकसभेच्या आधी हा निर्णय का नाही घेतला? अशी प्रश्नांची सरबत्तीच रोहित पवारांनी केली आहे. सरकारकडून आगीत तेल टाकून वाद वाढवण्याचे काम सुरू लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर हे सुरू ठेवले. मराठा आरक्षणाचा जीआर काढला आणि लगेच ओबीसी समिती नेमली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा वाद तुमचा सुरूच असणार आहे का? मराठा-ओबीसी वाद सुरू झाला आहे. यात सरकारकडून आगीत तेल टाकून वाद वाढवण्याचे काम सुरू असल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे.