अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळावर टीका:विरेंद्र पवार म्हणाले- हे महामंडळ म्हणजे मराठा तरुणांचे सिबिल खराब करण्याचे साधन

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकणार आहेत. ते मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत, ज्याची तयारी म्हणून आज मुंबईतील शिवाजी नाट्य मंदिर येथे एक बैठक पार पडली. या बैठकीला मुंबई आणि उपनगरातील मराठा समाजाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर मराठा आंदोलक विरेंद्र पवार यांनी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, हे महामंडळ म्हणजे मराठा तरुणांचे सिबिल खराब करण्याचे एक साधन असल्याची त्यांनी टीका केली आहे. विरेंद्र पवार म्हणाले, मनोज जरांगे आंदोलन करत आहेत हे लक्षात आल्यावर आता 1 वर्षापासून झोपलेले सरकार जागे झाले आणि आता मराठा आरक्षण उपसमिती सरकारने नेमली. ज्यांनी समाजाबाबत चुकीची वक्तव्य केली, त्यांना सरकारने समितीचे अध्यक्ष केले. मराठा समाजासाठी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. परंतु, याचा व्याज परतावा मिळत नाही. मराठा समाजाच्या मुलांचे सिबिल खराब करण्याची यंत्रणा म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. पुढे बोलताना विरेंद्र पवार म्हणाले, या समितीने सांगितले की, प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वसतिगृह करू. 5 कोटी त्यासाठी ग्रांट देऊ. कुठे आहे वसतिगृह आणि कुठे आहे ग्रांट? प्रत्येकवेळी समाजाला चुकीच्या प्रकारचे आरक्षण देता आणि कोर्टाच्या पिंजऱ्यात उभे करतात, हे आम्ही सहन करणार नाही. आम्हाला 50 टक्क्यांच्या आत आरक्षण द्या. यासाठी घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता नाही. सकल मराठा मोर्चाचे समन्वयक धनाजी साखळकर म्हणाले, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या ‘चलो मुंबई’ या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून यंदाचा गणपती आम्ही अरबी समुद्रात विसर्जित करू. मुंबईकरांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच मुंबईकर आमच्या या निर्णयाच्या पाठीशी राहून आम्हालाही अरबी समुद्रात गणपती विसर्जन करू देतील, अशी अपेक्षा देखील त्यांनी बोलून दाखवली.