महाराष्ट्र

हैदराबादहून आलेला पर्यटक सिंहगडावर बेपत्ता:हवा पॉइंट जवळ सापडली गौतमची चप्पल, दरीत कोसळल्याची शंका; बचावकार्य सुरू

पुण्याजवळील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर बुधवारी संध्याकाळी भीषण घटना घडली. हैदराबादहून पर्यटनासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणाचा तानाजी कड्यावरून पाय घसरून खोल दरीत पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

गौतम गायकवाड असे या तरुणाचे नाव असून तो साताऱ्याच्या फलटणचा रहिवासी आहे. गौतम आपल्या चार मित्रांसह पुणे परिसरात फिरण्यासाठी आला होता. संध्याकाळच्या सुमारास ते तानाजी कड्याकडे गेले असता, गौतमने मित्रांना लघुशंकेसाठी जात असल्याचे सांगून पुढे पावले टाकली. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत न आल्याने मित्रांनी शोधाशोध सुरू केली.

 

 यावेळी हवा पॉइंटजवळ त्याची चप्पल सापडली, पण गौतम कुठेच दिसला नाही. घाबरलेल्या मित्रांनी तातडीने १०० नंबरवर फोन करून पोलिसांना कळवले.

 

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस स्टेशनचे अधिकारी सचिन वांगडे, पीएसआय दिलीप शिंदे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन पथक, मावळा जवान संघटना आणि वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, निसरडी जमीन आणि जोरदार वाऱ्यामुळे शोधमोहीम रात्री थांबवावी लागली. मात्र गुरुवारी पहाटेपासून पुन्हा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.

 

 गेल्या काही दिवसांपासून सिंहगड परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि वेगवान वारे यामुळेच गौतमचा पाय घसरून तो दरीत कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

गौतम अजूनही बेपत्ता असून, संपूर्ण सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांत हळहळ व्यक्त होत असून, गौतम सुखरूप सापडावा यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे.

 

 सिंहगडाच्या दऱ्याखोऱ्यात चाललेली ही थरारक शोधमोहीम नेमका कोणता निकाल लावते, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button