आडकर फाउंडेशनतर्फे ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन:वारीमुळे मराठी भाषा टिकून राहिली, डॉ. सदानंद मोरे यांचे मत

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. संतांच्या अभंगांमुळे मराठी भाषेचा प्रचार होण्यासह ती टिकविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून होत आहे. या वारीची अलौकिक परंपरा, सत्यता, महती वाचकांपर्यंत पोहोचविण्यास ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या ग्रंथाचा दस्तावेजासारखा उपयोग होणार आहे, असे गौरवोद्गार संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. आडकर फाउंडेशनतर्फे बबनराव पाटील लिखित ‘विठ्ठलवारी आनंद यात्रा’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झाला. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिखर बँकेचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर मंचावर होते. डॉ. मोरे पुढे म्हणाले, वाचकांच्या आजच्या काळातील अपेक्षेनुसार बदलत्या तंत्रज्ञानाला अनुसरून या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकात अनेक अभ्यासक, विचारवंताचे लेख, उत्तम छायाचित्रे, दृकश्राव्यमाध्यमाचा चपखल वापर केल्याने वारीचे समग्र दर्शन घडणार आहे. हे पुस्तक वारीविषयी सर्वांगिण माहिती देणारे असल्याने वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करेल. तंत्रज्ञानाची कास धरत संपूर्ण वारीचे समग्र दर्शन घडविणारी ही पहिलीची निर्मिती असल्याने हे पुस्तक निर्मितीक्षेत्रातही वस्तुपाठ ठरणार आहे. श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती : विद्याधर अनास्कर विद्याधर अनास्कर म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून पंढरीच्या वारीचा प्रसादरूपी ठेवा वाचकांपर्यंत आला आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा देव, कष्टकऱ्यांचा आधार आहे. त्याच्या वारीतून निर्माण होणाऱ्या श्रद्धेच्या अनाकलनीय रूपाची प्रचिती या पुस्तकातून उलगडली आहे. हे नुसते पुस्तक नसून लेखकाच्या साधनेचा कृतीतून साकारलेला सत्य आणि सौंदर्यांचा मिलाफ आहे. बबनराव पाटील म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून अक्षरवारीची निर्मिती झाली असून वाचकांना वारीचा सुरुवातीपासून परतीपर्यंतचा प्रवास अनुभवता येणार आहे. तसेच अनेक विचारवंत, अभ्यासक यांचे लेख, विज्ञान आणि श्रद्धा यावर मान्यवरांनी केलेले भाष्य यांचाही समावेश आहे. हे पुस्तक आहे की ग्रंथ हे वाचकांनी ठरवावे. पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारे उत्पन्न वृंदावन शाळेच्या कार्यासाठी वापरले जाणार आहे.