खड्डे बुजवूया अपघात टाळूया:विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदानातून बुजवले नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे

वैजापूर तालुक्यातून जाणारा नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्ग (NH 152 I) सध्या मोठ्या प्रमाणावर खराब अवस्थेत आहे. या महामार्गावर जागोजागी खोल खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. विशेषतः हडस पिंपळगाव परिसरात खड्ड्यांची संख्या वाढली असून, रिमझिम पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून धोकादायक तळ्याचे रूप घेत आहेत. यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक मोटारसायकल अपघात झाले असून, अनेकजण जखमीही झाले आहेत. या वारंवार होणाऱ्या अपघातांनी त्रस्त होऊन हडस पिंपळगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, पालक, तसेच गावातील पोलिस पाटील, तंटामुक्ती समितीचे सदस्य यांनी एकत्र येत सामाजिक दायित्व स्वीकारले. इयत्ता आठवीतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी हातात फावडे, घमेले घेऊन महामार्गावरील मोठे खड्डे बुजवण्यासाठी श्रमदान केले. या उपक्रमातून महामार्ग सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थांनी यावेळी “राष्ट्रीय महामार्ग विभागाने आता तरी जागे व्हावे आणि महामार्गाची दुरुस्ती तातडीने करावी” अशी मागणी केली. हा उपक्रम छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री संकल्पनेला अनुसरून राबविण्यात आला. “उद्याचे जबाबदार नागरिक घडावेत” हा उद्देश साध्य व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “खड्डे बुजवूया – अपघात टाळूया” हा संदेश विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला. या श्रमदानात शाळेचे मुख्याध्यापक भाडाईत, शिक्षक गोरे, शिक्षिका सावळे, दानेकर यांच्यासह पोलिस पाटील कारभारी निघोटे, बाळासाहेब निघोटे, ज्ञानेश्वर निघोटे, लक्ष्मण गाजरे, अभिषेक नांगरे, शरद निघोटे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.