शिवतीर्थावर दिसणार ठाकरे बंधूंची राजकीय युती?:दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? सचिन अहिर यांनी दिले संकेत

आगामी महापालिका निवडणुका जवळ आल्याने यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. पण यंदाचा मेळावा विशेष असणार आहे. कारण मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील राजकीय दुरावा कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिसू शकतात. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार सचिन अहिर यांनी हे महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. गणेशोत्सवानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर एक चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे, असे अहिर यांनी सांगितले. त्यांनी थेटपणे म्हटले की, दसरा मेळाव्यासाठी आम्ही राज ठाकरेंना निमंत्रण देऊ शकतो. ही केवळ दोन पक्षांची गरज नसून, महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही लोकांच्या मनातील भावना आहे, असेही त्यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. यंदाचा मेळावा न भूतो न भविष्यति अहिर यांनी स्पष्ट केले की, दसरा मेळावा हा केवळ राजकीय नसून, सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या मेळाव्यातून उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. ते म्हणाले की, दोन भाऊ व्यासपीठावर एकत्र येतील की नाही हे सांगणे कठीण आहे, पण आम्ही त्यांना नक्कीच आमंत्रण देऊ शकतो. ‘जसा आमचा दसरा मेळावा असतो, तसा त्यांचा गुढीपाडवा मेळावा असतो. त्यामुळे तेही आम्हाला आमंत्रण देऊ शकतात’, असे ते म्हणाले. परंतु, यंदाचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा ‘न भूतो न भविष्यति’ असा असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यासाठी एकत्र येणे गरजेचे मुंबईतील बदलत्या भौगोलिक परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना अहिर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांनी सांगितले की, मुंबईचे स्वरूप गेल्या काही वर्षांत खूप बदलले आहे. त्यामुळे, मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन नेतृत्व करणे ही काळाची गरज आहे. शिवसेनेप्रमाणे कोणताच पक्ष महानगरपालिका चांगल्या प्रकारे चालवू शकत नाही, असे त्यांना पूर्वीपासूनच वाटत होते, असेही त्यांनी सांगितले. हे ही वाचा… अमोल मिटकरी यांच्याकडून बिनशर्त दिलगिरी:सोलापूर महिला पोलिस अधिकाऱ्यांवरील आरोप भोवले; म्हणाले- नेतृत्वाच्या भूमिकेशी सहमत सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. यासंबंधीचा वाद वाढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली आहे. सविस्तर वाचा…