गणेशोत्सवात पुणे मेट्रोचा विक्रम:10 दिवसांत 37 लाख प्रवाशांचा प्रवास; पाच कोटी 67 लाख 27 हजारांचे उत्पन्न

पुण्यातील गणेशोत्सवाला ऐतिहासिक परंपरा असून विविध ठिकाणावरुन पुण्यातील गणेशोत्सव पाहण्याकरिता मोठ्या प्रमाणात दरवर्षी गर्दी होत असते. यंदा पुण्यात मेट्रोचे वतीने नागरिकांच्या सोईनुसार वेळापत्रकात बदल केल्याने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनला (महामेट्रो) चांगलाच फायदा झाल्याचे दिसून येत आहे. दहा दिवसाच्या कालावधीत एकूण ३७ लाख १६ हजार ५१२ प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केल्याने मेट्राला पाच कोटी ६७ लाख २७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सन २०२४ मध्ये महामेट्रो मधून गणेशोत्सवात एकूण २० लाख ४४ हजार ३४२ प्रवाशांनी प्रवास केल्याने तीन कोटी पाच लाख ८१ हजार ५९ रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळाले होते. मात्र, यंदा मेट्रो सिव्हील कोर्ट ते स्वारगेट असा मेट्रोचा शहराचा मध्यवर्ती भागात भुयारी मार्ग सुरु झाल्याने त्याचा फायदा मेट्रोला होऊ शकल आहे. तसेच शहरात गणेशोत्सवात देखावे पाहण्यासाठी वाहने घेऊन येणाऱ्यांच्या संख्येत देखील काहीशी कमतरता आली. त्यामुळेच यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत दोन कोटी ६१ लाखांचे अधिकचे उत्पन्न मेट्रोला मिळू शकले आहे. ऑगस्ट महिन्यापासून मेट्रोने दर दहा मिनिटांची मेट्रो फेरी सेवा सहा मिनिटांवर देखील आणली आहे. तसेच गणेश उत्सव काळात रात्री देखील मेट्रो सेवा अखंड सुरु ठेवल्याने नागरिकांना इच्छित स्थळी वेळेत व सुरक्षित जाण्यास मदत झाली. अनंत चतुर्दशी दिवशी मेट्रो मधून सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला असून एकाच दिसात ५.९० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याने ६८ लाख ९५ हजारांचे उत्पन्न प्राप्त झाले. गणेशोत्सवात पहिल्या सहा दिवसातच मेट्रोने तीन लाख ८३ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने ३ लाख ५७ हजार रुपयांचे उत्पन्न मेट्रोला मिळालेले आहे.