सर्पमित्रांना शासनाची अधिकृत ओळख हवी!किरणभाई वंजारे यांची आक्रमक मागणी… साप वाचवणाऱ्यांना सन्मान कधी मिळणार?

वसई/प्रतिनिधी:
विषारी साप कुठेही दिसला की लोक घाबरतात… पण कुणीही न बोलावता जीव धोक्यात घालणारे “सर्पमित्र” धाव घेतात!
सापाला जीवदान देतात, आणि माणसांचे प्राण वाचवतात.
मात्र हे सारे करत असताना त्यांच्याकडे ना कोणती शासकीय ओळख… ना सुरक्षा… ना अधिकार!
ही परिस्थिती बदलायलाच हवी, असं म्हणत “आपले मानवाधिकार फाउंडेशन”चे वसई तालुकाध्यक्ष किरणभाई वंजारे यांनी ठणकावून शासनाला आवाहन केलं आहे –
“सर्पमित्रांना तातडीने अधिकृत ओळखपत्रे द्या!”
त्यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली की –
“हे सर्पमित्र दिवस-रात्र, जीवाची पर्वा न करता समाजासाठी कार्य करतात.
अनेक वेळा त्यांना साप पकडताना स्वतःच्या जिवावर बेततं, पण अजूनही शासनाकडून कोणतीही अधिकृत मान्यता मिळालेली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे.”
वसई-पालघर परिसरात अशा शेकडो सर्पमित्रांनी दररोज नागरिकांना मदत केली आहे.
सर्प पकडतानाचे व्हिडिओ, लोकांनी काढलेले आभाराचे संदेश – हे सारे प्रमाणपत्रासारखे पुरावे असतानाही त्यांना शासकीय ओळख का नाही, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
त्यांची प्रमुख मागणी पुढीलप्रमाणे आहे –
▪️ सर्पमित्रांची शासनस्तरावर नोंदणी व्हावी
▪️ त्यांना अधिकृत ओळखपत्र मिळावे
▪️ काम करताना आवश्यक सुरक्षा साधने पुरवावीत
▪️ आपत्कालीन परिस्थितीत प्राथमिक मदत आणि विमा सुविधा द्याव्यात