मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात राजकीय रणकंदन; ओबीसी नेत्यांचा इशारा – “शांत आहोत पण विस्फोटक आहोत!”

मुंबई/प्रतिनिधी राज्यातील आरक्षणाच्या वादाला आता अधिक तडका बसला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर तीव्र हल्ला चढवत त्यांना “लबाड कोल्हा” असा उल्लेख केला आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाला त्यांनी “टगे” असे संबोधत आगामी काळात संघर्षयात्रेची घोषणा केली.
हाके म्हणाले, “हे लोक आता ओबीसींचे आरक्षण घेऊन निवडणुकीला उभे राहणार आहेत. फुले-शाहू-आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण संपवण्याचा डाव सत्ताधारी व विरोधक खेळत आहेत. पण ओबीसी ताठ मानेने धडा शिकवतील.”
दरम्यान, मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईत भव्य आंदोलन करणार असल्याने राजकारण तापले असतानाच हाके यांनी सत्ताधारी व विरोधकांना इशारा दिला, “ओबीसी शांत आहेत म्हणून त्यांच्या शक्तीचा कमी लेख करू नका. निवडणुकीत दोघांनाही जागा दाखवून देऊ.”
शरद पवारांवरही टोल
हाके यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मंडल यात्रेलाही “डुप्लिकेट” ठरवत, नागपूरातील उपक्रम सत्ताधाऱ्यांना भुलवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले.
बबनराव तायवाडेंचीही जरांगेंवर टीका
ओबीसी महासंघ अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही जरांगेंच्या “मराठा विरुद्ध दंगल” या वक्तव्याला फेटाळून लावले. गोव्यात झालेल्या ओबीसी अधिवेशनाबाबत “कटाचा प्रश्नच नाही” असे सांगत त्यांनी जरांगेंना खुल्या चर्चेचे आव्हान दिले.
राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानांचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत आणि आगामी दिवसांत ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.