हिंगोलीच्या पालकमंत्र्यांचा दौरा अवघ्या दीड तासांचा:मंत्री नरहरी झिरवळ 15 ऑगस्टचे ध्वजारोहण करणार अन् लगेच नांदेडला निघणार

हिंगोलीच्या पालकमंत्रीपदामुळे नाराज झालेल्या पालकमंत्री नरहरी झिरवळ यांची नाराजी अद्यापही कायम असल्याचे चित्र असून शुक्रवारी ता. १५ ध्वजारोहणासाठी येणाऱ्या झिरवळांचा दौरा अवघ्या दीड तासात आटोपणार आहे. त्यांच्या धावत्या दौऱ्यामुळे त्यांना जिल्हयातील प्रश्नांबाबत कुठल्याही प्रकारची आस्था नसल्याचेच यावरून दिसून येत आहे. तर दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीची बैठक नसल्यामुळे अधिकारी वर्गही सुखावला आहे. हिंगोली सारख्या मागास जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यामुळे पालकमंत्री झिरवळ यांनी हिंगोलीच्या पहिल्याच दौऱ्यात नाराजी व्यक्त केली. गरीब जिल्ह्याचे पालकत्व दिल्यावरून त्यांनी उघड नाराजी व्यक्त केल्याने टिका होऊ लागल्याने त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवा सारव केली. त्यानंतर त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणे टाळले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांनी पालकमंत्री असतांनाही हिंगोली येथे टाळून आपली उघड नाराजी व्यक्त केली. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. टंचाईच्या काळात त्यांनी एकदाही जिल्हयात येऊन पाहणी केली नाही तर इतर प्रश्नांवरही अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर शासनदरबारी पाठपुरावा करण्याची तसदीही घेतली नाही. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीची ता. २८ मे रोजी त्यांनी आॅनलाईन बैठक घेतली. या बैठकीचे इतिवृ्त्त स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी नाशीक येेथेच मागवून घेतले. त्यानंतर मंजूर कामांची यादीही प्रशासनाकडे ऑनलाईन पाठवली. आता ता. १५ ऑगस्ट रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक होईल या उद्देशाने प्रसासनाने जय्यत तयारी केली होती. मात्र पालकमंत्री झिरवळ यांनी त्यांचा हिंगोली दौरा अवघ्या दिड तासाचा ठरविला आहे. यामध्ये झिरवळ हे नांदेड येथे मुक्कामी थांबणार असून त्यानंतर ध्वजारोहन करून परत नांदेडला जाणार आहे. त्यांच्या दौऱ्यात कुठल्याही बैठका नसल्याने अधिकारी देखील सुखावले आहेत. दरम्यान, आता पालकमंत्र्यांची नाराजी कधी दूर होणार अन जिल्ह्याच्या प्रलंबित प्रश्नांना गती कधी मिळणार याची प्रतिक्षा नागरीकांना लागली आहे. तर हिंगोलीचे पालकमंत्री नांदेडला मुक्कामी थांबून काय करणार असा सवालही उपस्थित केला जाऊ लागला आहे. असा असेल पालकमंत्र्यांचा दौरा पालकमंत्री झिरवळ शुक्रवारी ता. १५ सकाळी साडेसात वाजता नांदेड येथील शासकिय विश्रामगृहावरून निघणार असून सकाळी ८.४५ वाजता हिंगोलीत पोहोचतील. त्यानंतर ९ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून नऊ वाजून पाच मिनीटांनी ध्वजारोहन करतील. त्यानंतर सव्वा दहा वाजता नांदेडकडे रवाना होणार आहेत.