महाराष्ट्र

लक्ष्मण हाके यांचा जरांगेंवर हल्लाबोल:म्हणाले – फडणवीस वगळता सर्वांचा जरांगेंना पाठिंबा; त्यांना बेड्या ठोका मराठवाड्यातून हद्दपार करा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठण्याची घोषणा केल्यापासून मराठा विरूद्ध ओबीसी वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सोमवारी नागपुरात बोलताना जरांगे यांना बेड्या ठोकून मराठवाड्यातून हद्दपार करण्याची मागणी करत त्यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वगळता सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचा आरोपही हाके यांनी यावेळी केला. बेकायदा मागणी करून कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणाऱ्या, मुंबईला वेठीस धरणाऱ्या महाराष्ट्राच्या मानसिकतेवर परिणाम करणाऱ्या आणि ओबीसीच्या मनात दहशत निर्माण करणाऱ्या माणसाला बेड्या ठोकल्या पाहिजे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. जरांगेचे साथीदार जेलमध्ये गेले, याला मराठवाड्यातील दहा-बारा जिल्ह्यातून हद्दपार करा. त्याशिवाय महाराष्ट्रातील परिस्थिती शांत होणार नाही, अशी सडकून टीकाही केली. त्यांनी या अगोदर देखील गुलाल उधळला आहे. या माणसाला संविधानाबद्दल काही कळत नाही. याला आरक्षणातील काही कळत नाही. मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढणे, अजित पवार, शरद पवारांच्या भरोशावर पैसे उकळणे आणि महाराष्ट्रात जात वर्चस्वाची लढाई लढणे हा यांचा अजेंडा आहे, असा आरोप हाके यांनी केला. मी समोरासमोर लढणारा माणूस आहे. माझा पुतळा कशाला जाळता मी स्वतः तिथे येतो. मला जाळायचा प्रयत्न तुम्ही करा. आम्ही ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी बळी जाण्यासाठी तयार आहोत असे आव्हान हाके यांनी आमदार विजयसिंह पंडित यांना दिले. शरद पवारांवर ओबीसींचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांनी अशी नौटंकी करू नये. एकतर जरांगेला पाठिंबा द्या नाहीतर मंडल यात्रा काढा. एका बाजूने जरांगेला पाठिंबा देऊन तुम्ही मंडल यात्रा काढत असाल तर त्याचा तुम्हाला अधिकार नाही. निदान म्हातारपणी तरी खोटं आणि लबाड बोलू नका. मग तुमच्यावर बोलल्यावर अशा ज्येष्ठ नेत्यांना आमच्यासारखे बारके पोर बोलणे योग्य वाटत नाही. मुंबईमध्ये जाऊन यांना जाळपोळच करायची आहे. दुसरं काहीच नाही असा स्पष्ट आरोप हाके यांनी केला. ओबीसीमध्ये आरक्षण घेऊन मराठा समाजाला व्यवस्था हातात घ्यायची असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.‌ आरक्षणाच्या माध्यमातून नोकरशाहीमध्ये आपली लोक घुसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button