महाराष्ट्र

गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा:कोपर्शीच्या जंगलात आठ तास चकमक; एक पुरुष, तीन महिला ठार ; शस्त्रसाठा जप्त

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात आज पहाटे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक उडाली. सुमारे आठ तास चाललेल्या या कारवाईत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. ठार झालेल्यांमध्ये एक पुरुष व तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. मुसळधार पावसाच्या तडाख्यातही गडचिरोली पोलिसांनी ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शीच्या जंगलात गट्टा दलम, कंपनी क्रमांक १० आणि इतर नक्षलवादी दबा धरून बसले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अप्पर पोलिस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सी-६० च्या १९ पथकांसह CRPF च्या QAT ची दोन पथके या भागात रवाना करण्यात आली. मुसळधार पावसातही पोलिसांनी राबवली मोहीम या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे परिस्थिती कठीण असतानाही पोलिस दलाने शोधमोहिम सुरू ठेवली. आज सकाळी पोलिस पथके कोपर्शीच्या जंगलात शोधमोहिम राबवत असताना नक्षलवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तातडीने प्रतिउत्तर देत जोरदार कारवाई केली. आठ तासांच्या चकमकीत चौघांना कंठस्थान सुमारे आठ तास नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीनंतर परिसराची पाहणी केल्यावर चार जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांना आढळले. त्यामध्ये एक पुरुष नक्षलवादी आणि तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक SLR रायफल आणि दोन INSAS रायफलसह मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. शोध मोहिम अजूनही सुरू दरम्यान, या भागात उर्वरित माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू आहे. गडचिरोली पोलिसांना राबवलेले आजचे अभियान यशस्वी झाले. शिवाय त्यांना मिळालेली गुप्त माहिती ही खरी ठरली. त्यामुळे चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश मिळाले. या ठिकाणी अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याचे समजते. गडचिरोली पोलिसांच्या यशस्वी मोहिमेबद्दल पोलिस दलाचे कौतुक होत आहे. हे ही वाचा… मनोज जरांगेंना मुंबईतील आंदोलनास सशर्त परवानगी:जरांगे म्हणाले – मागण्याही एका दिवसांत मान्य करा; वाचा पोलिसांचा आदेश जशास तसा मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांना काल दिनांक 26 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलनासाठी परवानगी नाकारली होती. परंतु, तरीदेखील मनोज जरांगे यांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. त्यातच आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, ही परवानगी एका दिवसासाठी देण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही सर्व नियमांचे पालन करत आंदोलन करणार आहोत. परंतु, हे आंदोलन एक दिवसाचे नाही, तर बेमुदत असणार आहे. 29 ऑगस्ट रोजी मी उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले. सविस्तर वाचा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button