पुण्यात मोबाइल चोराला बेड्या:१७ मोबाइल आणि दोन दुचाकींसह शंकर गायकवाड नामक आरोपी ताब्यात

पुणे शहर, तसेच ग्रामीण भागातून मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. चोरट्याकडून १७ मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. चोरट्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. शंकर गणपत गायकवाड (रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसरमधील काळेपडळ परिसरात मोबाइल चोरी प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. हवालदार प्रतीक लाहीगुडे यांनी चोरलेल्या मोबाइलचा तांत्रिक तपास केला. मोबाइल चोरणारा चोरटा महंमदवाडीतील तरवडे वस्ती भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी गायकवाड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुरुवातील दोन मोबाइल जप्त करण्यात आले. गायकवाड हा तरवडे वस्ती परिसरातील मोकळ्या जागेत एका झोपडीत राहत होता. झोपडीसमोर दोन दुचाकी लावण्यात आल्या होत्या. दुचाकीला असलेल्या पिशवीची पोलिसांनी तपासणी केली, तेव्हा पिशवीत १७ मोबाइल सापडले. त्याच्याकडील दोन दुचाकी त्याने चोरल्याची कबुली दिली. चौकशीत गायकवाड याने भारती विद्यापीठ, काळेपडळ, समर्थ पोलीस ठाणे, तसेच भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाइल चोरल्याचे निष्पन्न झाले. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर काळंगे, सहायक निरीक्षक अमित शेटे, पोलीस कर्मचारी दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले यांनी ही कामगिरी केली. गाड्यांची बॅटरी चोरणारा गजाआड वाहनांची बॅटरी चोरी करणाऱ्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. शाहिद शरिफ शहा (वय १९, रा. अनिता हाईट, शिवनेरीनगर, कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शहा याने वाहनांची बॅटरी चोरल्याची माहिती शाहिद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळाली. त्याला महंमदवाडी परिसरात बॅटरी चोरी करण्याच्या तयारीत असताना पकडले. त्याच्याकडून चार बॅटऱ्या, एक दुचाकी जप्त करण्यात आली.