सामाजिक

चंद्रशेखर बावनकुळेच हल्ल्याचा मास्टरमाइंड, व्हिडिओ दाखवत प्रवीणदादा गायकवाड यांचा सनसनाटी आरोप

पुणे/प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोटमध्ये भ्याड हल्ला करण्यात आला. दीपक काटे याच्यासह शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गायकवाडांच्या वंगण ओतून धक्काबुक्की केली. या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपल्यावर झालेला हल्ला भाजपा पुरस्कृत असून याचा मास्टरमाईंड महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेच असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी त्यांनी पुरावा म्हणून काही व्हिडिओ देखील दाखवले आहेत.

या घटनेतील मुख्य आरोपी दीपक काटे हा भाजपाच्या युवा मोर्चाचा प्रदेश सरचिटणीस असून त्यानं अनेक वेळा भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे माझे गॉडफादर असल्याचं सांगितलं आहे. तसेच, बावनकुळेंनी देखील दीपक काटे याच्यामागे मी उभा असल्याचं अनेकदा सांगितलं आहे. दीपक काटे हे केवळ एक प्यादं आहे. माझ्यावर हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड चंद्रशेखर बावनकुळे हे असल्याचा मोठा दावा प्रवीण गायकवाड यांनी केला.

प्रवीण गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, अक्कलकोट इथं झालेला हल्ला सरकार पुरस्कृत आहे. या हल्ल्यामागे भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे. सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद असणाऱ्या, भाजपचा आमदार असणाऱ्या आणि बावनकुळे यांचा नातेवाईक चौकशी अधिकारी असलेल्या ठिकाणी माझ्यावर हा हल्ला प्लॅन करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या पीआर टीमने माझ्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल केला, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शत प्रतिशत भाजपला आम्ही अडचण आहोत, म्हणून आमच्यावर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काही दिवसांपूर्वी नागपूर इथं बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, वंचित बहुनज आघाडी या संघटना संपवण्याचा विचार मांडण्यात आला आणि त्यानंतर आता माझ्यावर हल्ला झाला. आज माझ्यावर बेतलं ते उद्या कुणावरही बेतू शकतं, असंही प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे.

गुन्हेगाराला मुक्त सोडून माझ्या हत्येसाठी पाठवले, असा आरोप गायकवाड यांनी केला. ज्याचा बंदोबस्त करायचा त्याला जशास तसे उत्तर देणार, ही या सरकारच्या शेवटाची सुरुवात आहे. असेही त्यांनी म्हटले.

दीपक काटे याने माझ्यावर हल्ला केला. या प्रकरणी आयोजकाकडून कुठलीही पोलिस तक्रार नोंदवली नाही. काटे याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याने स्वतःच्या भावाच्या खुनापासून शिक्षा भोगली आहे. त्याच्यावर जवळपास खंडणीपासून अनेक गंभीर गुन्हे आहेत. त्याला भाजपच्या युवा मोर्चाचे सरचिटणीसपद दिले आहे. बावनकुळे हे प्रदेशाध्यक्ष असताना दीपक कुटे त्यांच्यासोबत सतत दिसले असल्याचे सांगत गायकवाड यांनी तशा व्हिडिओ क्लीपही पत्रकार परिषदेत दाखवल्या.

विमानतळावर काटेला 2 पिस्तूल, 28 काडतूसे सापडल्या प्रकरणी अटक झाली. अशा परिस्थितीत त्याला जामीन देता येत नाही, असे असताना तपास अधिकाऱ्याने न्यायालयात खोटी माहिती दिली. न्यायालयासमोर काटेची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आणली नाही. ज्या आरोपीला मोका लावणे गरजेचे आहे त्याला मुक्त सोडले गेले. मुक्त सोडल्यानंतर त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला, असेही गायकवाड यांनी सांगितले.

पोलीस ऐकूण घेण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिसांचा हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही त्यांनी केला. संघपरिवारात ज्या संघटनांचा बंदोबस्त करावा असे सांगितले. त्यात बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी आणखी काही संघटना आहेत. 400 पार, शत प्रतिशत भाजपच्या आड आम्ही येतो म्हणून आमच्यावर हल्ला केल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केल.

माझ्यावर झालेला हा हल्ला पूर्व नियोजित कट रचून करण्यात आला असून हा सरकार पुरस्कृतच होता. सरकारने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय देवा. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button