महाराष्ट्र
दुसऱ्या धर्मासाठी असे भाषण केले तर चिरफाड होईल:सुप्रिया सुळेंच्या मटणावरील विधानावरून नितेश राणेंची टीका, म्हणाले- अशी मस्ती करू नये

- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाण्यावरून केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मी मटण खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, असे वक्तव्य सुळे यांनी केले होते. यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त करत जोरदार टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या विधानावर बोलताना नितेश राणे म्हणाले, हिंदू धर्माची हीच विशालता आहे. कोणी मटण मासे खावे कोणाची कसली बंदी नाही. सुप्रिया सुळे सातही दिवस मटण खात असल्या तरी तो त्यांचा प्रश्न आहे. सुप्रियाताई लव्ह जिहादचे स्वागत करतात. त्या हिंदू धर्म पांडुरंगाच्या बाबतीत बोलून कोणाला खुश करायचा प्रयत्न करतात, हे जगजाहीर आहे. पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, आमच्या मंदिरात जाताना अशा पद्धतीने अपमानित शब्द वापरत असतील तर वारकरी संप्रादयासह प्रत्येकाने रोष व्यक्त केला पाहिजे. हिंदू धर्मासारखे त्यांनी इतर धर्मासाठी असे काही बोलून किंवा करून दाखवावे. दुसऱ्या धर्मासाठी असे भाषण केले तर चिरफाड होईल. ही मस्ती फक्त आमच्या हिंदू धर्माबद्दल बोलताना होते, त्यांनी ही मस्ती करू नये, अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या? सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना मटण खाण्याबाबत म्हटले होते की, मी रामकृष्ण हरीवाली आहे. फक्त माळ घालत नाही, कारण कधी कधी मटण खाते. मी त्यांच्या सारखी खोटे बोलत नाही. खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? माझे आई वडील, सासू सासरे, नवरा खातो, आमच्या पैशाने खातो आपण कोणाला मिंदे नाही, जे आहे डंके की चोट पर आहे, दिल खोल कर चलो. खाते तर खाते, खाल्ले तर काय पाप केले का? मी नॉनव्हेज खाते, फक्त माळ घालत नाही, त्यामुळे अजून मोह होतो. ज्या दिवशी माळ घालेल त्या दिवशी मटण खाणे सोडून दिले असे समजा.