मानवी तस्करीचे क्रूर वास्तव:12 वर्षांच्या बांगलादेशी मुलीवर तीन महिने 200 पुरुषांकडून बलात्कार, मुंबईतून झाली सुटका

मीरा-भाईंदर पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी पथकाने एका 12 वर्षांच्या बांगलादेशी मुलीची वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून सुटका केली आहे. ही मुलगी शाळेच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे घरातून पळून गेली होती, त्यानंतर तिला मानवी तस्करीच्या क्रूर जाळ्यात अडकवण्यात आले. या दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तब्बल 200 हून अधिक पुरुषांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमके काय घडले? 26 जुलै रोजी दोन स्वयंसेवी संस्था (Exodus Road India Foundation आणि Harmony Foundation) आणि मीरा-भाईंदरच्या मानव तस्करी विरोधी पथकाने वसईजवळच्या नायगाव परिसरात संयुक्त मोहीम राबवली. नायगाव (पूर्व) येथील एका इमारतीत छापा टाकून केलेल्या या कारवाईत पोलिसांनी एका 12 वर्षीय अल्पवयीन बांगलादेशी मुलीची आणि एका 20 वर्षीय महिलेची सुटका केली. त्याचवेळी, मोहम्मद खालिद बापरी, जुबेर शेख आणि शमीन सरदार या तीन बांगलादेशी आरोपींना अटक करण्यात आली. तस्करी कशी झाली? हार्मोनी फाउंडेशनचे अध्यक्ष अब्राहम मथाई यांच्या माहितीनुसार, ही 12 वर्षांची मुलगी परीक्षेत नापास झाल्यामुळे घाबरून घरातून पळून गेली होती. त्यानंतर, तिच्याच गावातील ‘मीम’ नावाच्या एका महिलेने तिला आमिष दाखतून बांगलादेशातून बेकायदेशीरपणे कोलकात्याला आणले. तिथे तिचे बनावट आधार कार्ड बनवून, नंतर तिला विमानाने मुंबईत आणले आणि नायगावमध्ये डांबून ठेवले. ड्रग्जचे इंजेक्शन देऊन वृद्धाकडून अत्याचार ‘हार्मनी फाउंडेशन’ने दिलेल्या निवेदनानुसार, पीडित मुलीला नायगावमध्ये एका वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या पत्नीसोबत इतर 7-8 मुलींसोबत अनेक दिवस डांबून ठेवण्यात आले होते. एके दिवशी तिथे त्या वृद्ध व्यक्तीने तिला इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला अनेक अनोळखी पुरुषांसमोर विकले गेले. तिला ड्रग्जचे इंजेक्शन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जात होते. 200 हून अधिक पुरुषांकडून लैंगिक अत्याचार हार्मोनी फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष अब्राहम मथाई यांनी सांगितले की, “मुलीला प्रथम गुजरातमधील नाडियाद येथे नेण्यात आले होते आणि तीन महिन्यांच्या कालावधीत 200 हून अधिक पुरुषांकडून लैंगिक शोषण झाले. ती अद्याप किशोरावस्थेत पोहोचलेली नाही, तरीही देह व्यापारातील राक्षसांनी तिचे बालपण हिरावून घेतले.” या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही मथाई यांनी केली आहे.