छत्रपती संभाजीनगरमधील हत्याकांडाचा VIDEO:बाप म्हणाला जिवंत सोडू नका, आईने हातात चाकू दिला; मुलांनी केले सपासप वार

एकाच गल्लीमध्ये राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये प्लॉटवर असलेल्या खडीवरून वाद झाला. निमोने कुटुंबातील ६ जणांनी समोरच राहणाऱ्या पाडसवान कुटुंबावर हल्ला करून चौघांना गंभीर जखमी करून एकाचा खून केला. ही घटना एन-६ मधील संभाजी कॉलनीमध्ये दुपारी घडली. यात पाडसवान कुटुंबातील प्रमोद रमेश पाडसवान (३८) यांचा दुर्दैवी अंत झाला, तर त्यांचे वडील रमेश जगन्नाथ पाडसवान (६०) आणि प्रमोद यांचा मुलगा रुद्राक्ष पाडसवान (१७) गंभीर जखमी झाले. आई मंदाबाई यांनाही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे आरोपी ज्ञानेश्वरने ज्या ठिकाणी गेल्या महिन्यात वाढदिवस साजरा केला, त्याच ठिकाणी शुक्रवारी खून केला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर काशीनाथ निमोने, गौरव काशीनाथ निमोने, सौरव काशीनाथ निमोने, काशीनाथ येडू निमोने, शशिकला काशीनाथ निमोने व जावई मनोज दानवेसह अन्य आरोपींवर सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती निरीक्षक कुंदन वाघमारे यांनी दिली. यातील ज्ञानेश्वर, काशीनाथ, मनोज, सौरव, गौरव या आरोपींना ताब्यात घेतले असून अन्य आरोपींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमोनेचा पाडसवान यांच्या जमिनीवर डोळा स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडसवान यांच्या घराच्या समोरच सिडकोचा ऑड साइजचा प्लॉट आहे. तो काही वर्षांपूर्वी त्यांनी विकत घेतला. मात्र त्याच ठिकाणी निमोने गणपती मंडळ अध्यक्ष असून त्यांचा एका राजकीय पक्षाशीदेखील संबंध असल्याने सातत्याने त्यांचा कॉलनीमध्ये वाद सुरू असायचा. याच गणेश मंडळाचा उत्सव पाडसवान यांच्या प्लॉटवर साजरा करण्यात येतो. मात्र आता पाडसवान यांना त्या ठिकाणी बांधकाम करायचे असल्याने निमोने त्यात नेहमी खोडा घालायचा. त्याने त्याच जागेवर मंडळाचे ढोल ठेवण्यासाठी शेड टाकले होते. सिडकोकडे अतिक्रमणाची रीतसर तक्रार केल्यावर एप्रिल महिन्यात त्यांनी हे अतिक्रमण हटवले होते. त्यानंतर १५ ते २० दिवसांपूर्वी त्याने पुन्हा त्याच ठिकाणी ढोल आणून ठेवले. त्यातून दोन्ही कुटुंबांत वाद झाला होता. त्यानंतर गणेशोत्सव जवळ येत असल्याने त्यांच्यातील वाद वाढत होता. बांधकामासाठी आणलेले साहित्य त्या ठिकाणी पडलेले होते. ते बाजूला करून घ्या आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा असे म्हणून निमोने त्यांच्यावर दबाव टाकायचे. त्यातूनच हा वाद विकोपाला जाऊन हल्ला झाला. आरोपींच्या क्रूरतेपुढे कॉलनीतील जमावही झाला स्तब्ध किराणा व्यावसायिक असलेल्या पाडसवान कुटुंबीयांवर निमोने कुटुंबीयांनी हल्ला केला. निमोने यांची तिन्ही मुले, जावई दानवे याने प्रमोद यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रमोद खाली पडल्यावर ज्ञानेश्वरने चाकूने त्यांच्या पाठीत चाकूने खुपसला. घाबरलेले रमेश पळून जात असताना सौरव, मनोज आणि काशीनाथ यांनी ‘याला आज जिवंत सोडायचे नाही, याचा खेळ संपवून टाकू’ असे म्हणून त्यांना मारहाण केली, तर आरोपी शशिकला हिने तिच्या हातातील चाकू सौरभच्या हातात दिला. रमेश यांना काही कळायच्या आतच त्याने त्यांच्या पोटात खुपसला.या वेळी रमेश यांचा नातू रुद्राक्ष मदतीसाठी आला. आरोपींनी ‘यालाही सोडू नका’असे म्हटले. त्यानंतर आरोपीने रुद्राक्षवरही चाकूने वार केला. मुलालाच माहिती त्याच्या बाबांचा मृत्यू झाला, आजी-आजोबांनाही नाही कल्पना आरोपी निमोने कुटुंबीयांनी पाडसवान कुटुंबीयांवार एवढ्या क्रूरतेने हल्ला केला की एन-६ मधील संभाजी कॉलनीतील नागरिक स्तब्ध झाले होते. दरम्यान, घटनेत प्रमोद यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा रुद्राक्ष आणि वडील रमेश गंभीर जखमी झाले, तर आई मंदाबाई यांना मार लागला आहे. प्रमोद यांचा मृत्यू झाल्याची माहिती फक्त त्यांचा मुलगा रुद्राक्षलाच आहे. त्याने पोलिसांना ‘मला बाबांना शेवटचे बघू द्या’ अशी विनवणी केली. या वेळी पोलिसांचेही डोळे पाणावले. त्यांनी रुद्राक्षला घाटी रुग्णालयात घेऊन जात मृत वडिलांचे अंतिम दर्शन घडवले. या वेळी रुद्राक्षने हंबरडा फोडला होता. मात्र, आपला मुलगा प्रमोदचा मृत्यू झाला याची रात्री उशिरापर्यंत वडील रमेश पाडसवान आणि आई मंदाबाई पाडसवान यांना कल्पनाही नव्हती. मुलाच्या मृत्यूची माहिती दिली तर रक्तदाबाचे रुग्ण असलेले रमेश यांची प्रकृती खालावण्याची भीती असल्याने नातेवाइकांनी माहिती देण्याचे टाळले. याआधी पाच ते सहा वेळा पोलिसांत तक्रार पाडसवान यांच्या जमिनीवर सातत्याने वाद सुरू होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी जमीन विकण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यांनाही येऊन निमोनेची मुले धमकावायची. यामुळे पाडसवान यांनी पाच ते सहा वेळा पोलिसांत तक्रारी केल्या होत्या.