मराठा आंदोलनाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांना:मुंबईत ‘देवाभाऊ’ कॅम्पेन; एकनाथ शिंदे म्हणाले – आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाही, विकास महत्त्वाचा

राज्यातील राजकारणात सध्या ‘देवाभाऊ’ या नावाने एक नवीन जाहिरात मोहीम सुरू झाली आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न यशस्वीपणे हाताळल्याबद्दल श्रेय दिले जात आहे. मराठा आंदोलनावर तोडगा काढल्याबद्दल मुंबईत विविध ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना दिसत आहेत आणि ‘देवाभाऊ’ असे लिहिले आहे. या मोहिमेमागे कोण आहे, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी, राजकीय वर्तुळात ही मोहीम मराठा आरक्षणाशी जोडली जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात माध्यमांशी विसर्जनानिमित्त संवाद साधला. यावेळी त्यांना देवाभाऊ कॅम्पेनबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “श्रेयवादाच्या लढाईत आम्ही नाही. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याया देण्याचे काम महायुती सरकार करत आहे. महायुती सरकारने मागच्या अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती आम्हाला गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत विजयाच्या रुपात मिळाली. देवेंद्रजी आणि आम्ही दुसरी इंनिग सुरू केली आहे. यापुढे देखील असेच काम करत राहू. हाच आमचा अजेंडा आहे.” मराठा आंदोलनाचे महत्त्व आणि फडणवीस यांचे यश मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी हजारो मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर धडक दिली. पोलिसांनी केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त लोक जमा झाले. यामुळे आंदोलकांनी सुरुवातीला फडणवीस सरकारवर नाराजी व्यक्त केली. यापूर्वी 2020 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना नवी मुंबईतच थांबवून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला होता. मात्र, यावेळी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या आंदोलनापासून दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. मराठा आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक विस्कळीत झाली आणि उच्च न्यायालयानेही यावर नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असताना, 2 सप्टेंबर रोजी सरकारने वेगाने पावले उचलली. शिंदे समितीच्या शिफारशींनुसार तीन शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आले, ज्यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला. यानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि आंदोलन शांतपणे संपले. या सर्व घडामोडींमध्ये फडणवीस यांनी अतिशय कुशलतेने परिस्थिती हाताळली आणि मराठा समाजाला दिलासा देतानाच ओबीसींची नाराजी होणार नाही याचीही काळजी घेतली, त्यामुळेच या यशाचे श्रेय त्यांना दिले जात असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात आहे.