मालमत्ताधारकांना पीआर कार्ड वितरित करा; अन्यथा डफडेबजाव आंदोलन राष्ट्रवादीचा भूमी अभिलेख उपअधीक्षकांना इशारा

देऊळगाव राजा /देवानंद झोटे गाव ठाण्यातील जागेची नोंदणी करण्यासाठी तसेच जागेचे इतर व्यवहार करण्यासाठी मालमत्ता धारकांना पीआर कार्ड ची आवश्यकता पडते. मात्र अनेक वेळा मागणी करून देखील भूमी अभिलेख कार्यालयाकडून देऊळगाव राजा शहरात प्रॉपर्टी धारकांना पीआर कार्डचे आद्यपही वितरण करण्यात आले नाही. शहरात तात्काळ पीआर कार्ड मोहीम राबवून मालमत्ता धारकांना पीआर कार्ड वितरित करा. अन्यथा भुमिअभिलेख कार्यालयात डफडे बजाव आंदोलन करू अशा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने उपअधीक्षक भूमी अभिलेख यांना देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, शहरांमधील गावठाण जागेची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयाकडून पीआर कार्डची मागणी केल्या जाते. तसेच मालमत्ता धारकांना जागे संदर्भात इतर व्यवहार पारदर्शकपणे करण्यासाठी प्रॉपर्टी रेकॉर्ड कार्ड ची आवश्यकता भासत आहे. मात्र देऊळगाव राजा येथील भुमिअभिलेख कार्यालयाकडून मालमत्ता धारकांना पीआर कार्ड अद्यापही वितरित करण्यात आलेले नाही. किंबहुना शहरात पी आर कार्ड संदर्भात मोहीम राबविण्यात आलेली नाही. मात्र जागेच्या नोंदणीसाठी पीआर कार्ड ची सक्तीने मागणी केल्या जात असल्याने जागेचे व्यवहार करण्यास नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात शहरातील नागरिकांकडून उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अनेक वेळा लेखी स्वरूपात पीआर कार्ड वितरित करण्याबाबत मागणी केली आहे. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाकडून सदर मागणीची दखल घेतल्या जात नाही. पीआर कार्ड संदर्भात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी मालमत्ता धारकांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन वेळ काढूपणा करत आहे. परिणामी मालमत्ताधारकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे शहरातील पीआर कार्ड वितरित करण्यासंबंधी प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा भूमी अभिलेख कार्यालयात डफडे बजाव आंदोलन करण्यात येईल,असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, शहराध्यक्ष विजय खांडेभराड,युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड,प.स. चे माजी सभापती हरीश शेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रंगनाथ कोल्हे, महेश देशमुख, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, गणेश बुरकुल, संदीप कटारे,बाळू शिंगणे, रफिक पठाण,बाबासाहेब कासारे विलास खराट, मंगल आंभोरे आदींनी दिला आहे.