१६ वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू !अंढेरा शिवारातील हृदयद्रावक घटना: गावात शोककळा

सिंदखेडराजा /अनिल दराडे
बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय बालकाचा पाय घसरल्याने अंदाजे २० फुट खोल पाण्याच्या खड्यात पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना १५ जुलै, मंगळवार रोजी अंढेरा शिवारात घडली. प्रणव केशव इंगळे असे मृत बालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी प्रणव बकऱ्या चारण्यासाठी वन विभागाच्या हद्दीतील एका मोकळ्या ठिकाणी गेला होता. दरम्यान, नैसर्गिक विधी आटोपल्यानंतर, पाय घसरून त्या ठिकाणी पाणी साचलेल्या अंदाजे १५ ते २० फुट खोल खोल खड्यात तो पडला. खोल खड्डा आणि पाणी जास्त असल्याने त्याचा श्वास गुदमरला व काही क्षणातच त्याची प्राणज्योत विझली. बराच वेळ होवूनही
प्रणव घरी न आल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले. अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यानंतर, प्रणवला बाहेर काढून त्याचा मृतदेह देऊळगाव मही येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला.
आई वडिलांचा एकुलता एक..
प्रणव हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. एका बहिणीसह त्याने घरात आई-वडिलांचे आधार स्तंभाचे स्थान घेतले होते. कधी शाळेत, कधी वडिलांना शेतात मदत, तर कधी बकऱ्या सांभाळण्याचे काम.. असा त्याचा दैनंदिन क्रम बनला होता. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण अंढेरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.