सिंदखेडराजा तहसीलमध्ये महसूल सहाय्यकाच्या मनमानी कारभाराने नागरिक हैराण
सिंदखेडराजा / प्रतिनिधी : सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक पदावर कार्यरत असलेले संजय सोनवणे यांच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरणे आणि प्रशासनाने दिलेल्या लॅपटॉपऐवजी मोबाईलवरच कामकाज करणे यामुळे अनेक जण त्रस्त झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून सोनवणे यांच्याविरोधात कार्यालयात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कामासाठी येणाऱ्या नागरिकांशी ते उद्धटपणे बोलतात, असा आरोप नागरिकांनी केला आहे. “आम्ही आमची कामे घेऊन येतो, तेव्हा ते आमच्याशी नीट बोलत नाहीत. त्यांच्या अरेरावीच्या भाषेमुळे आम्हाला मानसिक त्रास होतो,” असे एका नागरिकानी सांगितले.
विशेष म्हणजे, शासनाने आधुनिक कामकाजासाठी लॅपटॉप आणि संगणक उपलब्ध करून दिले असतानाही, सोनवणे यांचा सर्वाधिक वेळ मोबाईलवर कामकाज करण्यात जातो, असे दिसून येते. यामुळे कामांचा वेग मंदावतो आणि नागरिकांना ताटकळत थांबावे लागते. या प्रकारामुळे तहसील कार्यालयातील कामकाजावरही परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.
सोनवणे यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांची गैरसोय होत असून, प्रशासनाने या गंभीर तक्रारींची दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.