दैवत फाउंडेशन तर्फे दिल्या जाणाऱ्या समज रत्न पुरस्कार दैनिक लोकनेता चे मुख्य संपादक ज्ञानेश्वर बुधवंत यांना जाहीर

नांदेड /प्रतिनिधी शब्दांची ताकद काय असते, हे दाखवून देणारे काही पत्रकार असतात, जे केवळ बातम्या छापत नाहीत, तर समाजमन घडवतात. अशाच पत्रकारितेतील एक तेजस्वी, तळमळीचा, आणि ज्वलंत आवाज म्हणजे दैनिक लोकनेता चे संपादक श्री. ज्ञानेश्वर बुधवंत. अलीकडील काळात त्यांच्या समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत त्यांना विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
शब्दांमधून शोषित, वंचित, दुर्लक्षितांचा आवाज बनून उभे राहिलेले श्री. बुधवंत हे केवळ एक पत्रकार नाहीत, तर ग्रामीण जनतेचा आत्मा आहेत. त्यांच्या लेखणीतून निर्माण होणाऱ्या लाटांनी अनेकदा शासन यंत्रणा हलल्या, वंचितांचा आवाज पोहोचला, आणि अनेक प्रश्न मार्गी लागले.
या अखंड समर्पित प्रवासाचा गौरव म्हणून दैवत फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य या संस्थेने त्यांना “समाजरत्न पुरस्कार २०२५” जाहीर केला आहे. आज दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सेवगाव जि. अहिल्यानगर येथे स्वराज्य मंगल कार्यालय, मुंडे साहेब चौक, आखेगाव रोड, शेवगाव येथे आयोजित राष्ट्रीय अधिवेशन व पदाधिकारी मेळाव्यात या पुरस्काराने त्यांचा सन्मान होणार आहे. हा सन्मान म्हणजे ग्रामीण पत्रकारितेतील धैर्य, सामाजिक बांधिलकी आणि न्यायासाठीचा संघर्ष याची थेट मान्यता आहे.
त्याआधीही त्यांना २५ मार्च २०२५ रोजी बोदवड (जळगाव) येथे केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली तर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “संविधान गौरव पुरस्कार” मिळाला होता. मानवी हक्क, सामाजिक समता आणि लोकशाही मुल्यांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून सतत आवाज उठवणाऱ्या या पत्रकाराचा सन्मान संपूर्ण देशभरातून झाला होता.
याशिवाय, २२ ऑगस्ट २०२४ रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या कार्यक्रमात “राष्ट्रसंत भगवान बाबा समाज प्रबोधन महाराष्ट्र भूषण पुरस्कार” हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात आला होता. समाजप्रबोधन, विषमतेविरोधातील लेखन, आणि ग्रामीण भागातील वास्तव कथन या क्षेत्रातील त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाची ही पावती होती.
तसेच, डिसेंबर २०२४ मध्ये राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड त्यांच्या निर्भीड, तथ्याधिष्ठित, आणि विचारप्रवर्तक पत्रकारितेमुळे झाली होती.
या सर्व पुरस्कारांनी श्री. बुधवंत यांचे नाव केवळ मराठवाडा वा महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, तर देशपातळीवर ते पत्रकारितेचे प्रभावी आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
दैनिक लोकनेता या माध्यमातून त्यांनी शोषितांचा आवाज बनून शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षणातील अन्याय, प्रशासकीय भ्रष्टाचार, आणि सामाजिक विषमता याविरुद्ध जाणीवपूर्वक आवाज उठवला आहे. त्यांच्या बातम्यांमध्ये वेदना आहेत, तळमळ आहे आणि परिवर्तन घडवण्याची जिद्दही आहे.
आज अशा पत्रकारांना पुरस्कार मिळतो म्हणजे तो पुरस्कार स्वतःच पावन होतो. संपूर्ण संपादकीय मंडळ, सहकारी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाचकगण आणि पत्रकारिता प्रेमींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.