दोन निकामी किडन्यांचा आजार असूनही रोज 200 किमी प्रवास करून प्रामाणिक सेवा बजावणारे अधिकारी – साळूबा वेताळ यांचा सेवेला सलाम!”

सिंदखेड राजा (प्रतिनिधी):भूमी अभिलेख कार्यालय, सिंदखेड राजा येथील प्रमुख उपअधीक्षक साळूबा रामराव वेताळ यांची भोकरदन, जिल्हा जालना येथे बदली झाली असून, त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम काल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.या प्रसंगी मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, भूमापक अधिकारी प्रकाश शिंदे तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.साळूबा वेताळ यांनी दिनांक 28 जून 2024 रोजी सिंदखेड राजा येथे प्रमुख उपअधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या मागील एक वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कार्यालयीन शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि नागरिकांना योग्य सेवा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कार्यकाळात भूमी अभिलेख कार्यालयाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली.मात्र त्यांच्या कार्यकाळातील सर्वात मोठा आणि प्रेरणादायक पैलू म्हणजे – वेताळ हे दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिसवर असलेले पेशंट आहेत. त्यांना दर दोन दिवसांनी डायलिसिस करणे बंधनकारक असतानाही त्यांनी आपल्या आरोग्याची तमा न बाळगता दररोज छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथून सिंदखेड राजा येथे ये-जा करत एकूण 200 किलोमीटरचा प्रवास केला.या अत्यंत त्रासदायक आरोग्यस्थितीतही साळूबा वेताळ यांनी आपल्या जबाबदाऱ्यांकडे पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने पाहिले. कार्यालयातील त्यांच्या सहकाऱ्यांनीही त्यांच्या कार्यशैलीचे आणि कर्तव्यनिष्ठेचे विशेष कौतुक करताना भावूक होत सांगितले की,”अशा गंभीर आजारातही जे अधिकारी रोज कामावर उपस्थित राहून नागरिकांच्या कामांसाठी तत्पर असतात, तेच खरे लोकसेवक!”त्यांची बदली ही त्यांच्या आजारपणामुळे त्यांच्या विनंतीवरून करण्यात आली असून, त्यांच्या सेवाकार्याचा सन्मान म्हणून काल त्यांना मा. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि मा. तहसीलदार अजित दिवटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन निरोप देण्यात आला.या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे म्हणाले,”साळूबा वेताळ यांचं जीवन म्हणजे एक जिवंत प्रेरणा आहे. अपंगत्व, आजार किंवा अडथळे हे त्यांच्या सेवाभावासमोर क्षुल्लक वाटतात. त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श इतरांनीही घ्यावा.”कार्यक्रमात उपस्थित सहकाऱ्यांनीही त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व पुढील सेवेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.“आजारांवर मात करणारी जिद्द, लोकसेवेत अढळ निष्ठा आणि अविरत कर्तव्यपरायणता – साळूबा रामराव वेताळ यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरणारे आहे!”