जांभोऱ्याच्या महिलेची दीड वर्षाच्या मुलासह आत्महत्या! जिंतूर तालुक्यात विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल!

सिंदखेडराजा/विशेष प्रतिनिधी सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील २५ वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर तालुक्यात घडली आहे. १३ ऑगस्ट रोजी जिंतूर–येलदरी रस्त्यावरील मानकेश्वर शिवारातील एका विहिरीत आई-मुलाचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
मयतांचे नावे शारदा भरत देशमुख (वय २५) व मुलगा आदर्श भरत देशमुख (वय दीड वर्ष, रा. जांभोरा, ता. सिंदखेडराजा) अशी आहेत. १० ऑगस्ट रोजी शारदा देशमुख ही पतीसह शंभु महादेव (जि. जालना) येथे दर्शनासाठी गेली होती. दर्शनानंतर तिने बामणी (ता. जिंतूर) येथील माहेराकडे जाण्याचा हेतू व्यक्त केला होता. पती भरत देशमुख यांनी तिला तेथे रवाना केले, मात्र ती व मुलगा माहेरी पोहोचले नाहीत.
१२ ऑगस्ट रोजी पत्नी व मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार भरत देशमुख यांनी शेवली पोलिस ठाण्यात दाखल केली. दुसऱ्या दिवशी मानकेश्वर शिवारातील मारुती भिकाजी काकडे यांच्या मालकीच्या विहिरीत महिला व मुलाचे मृतदेह तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले व शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर मयत महिलेच्या माहेरील नातेवाईकांनी पती भरत देशमुख, सासरे नारायण देशमुख, सासू व जाऊ यांच्याविरुद्ध हुंडाबळी व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जिंतूर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याची माहिती ठाणेदार गजेंद्र सरोदे यांनी दिली.