शिवसेनेचा वीज प्रशासनावर दणदणीत दणका!आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्तक्षेपामुळे अखेर भोसा शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले सोलर साहित्य!

मेहकर, २४ जुलै (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कायमच आक्रमक भूमिका घेणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला अखेर मोठे यश मिळाले आहे. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या तडफदार आणि थेट हस्तक्षेपामुळे भोसा येथील तिघा शेतकऱ्यांच्या घरी आठ महिन्यांपासून वाट पाहत असलेले सोलर कनेक्शनचे साहित्य अखेर पोहोचले.
भोसा येथील शेतकरी विष्णू जयराम चंदनसे, यामिनी विष्णू चंदनसे व सहदेव भिकाजी बहादुरे यांनी तब्बल आठ महिने आधी सोलर कनेक्शनसाठी पैसे भरले होते. मात्र वीज वितरण कंपनी आणि सोलर यंत्रणांची टाळाटाळ, चालढकल, आणि फसव्या आश्वासनांमुळे हे शेतकरी अक्षरश: त्रस्त झाले होते.
हा अन्याय न सहन करता, विष्णू चंदनसे यांनी ११ जुलै रोजी वीज टॉवरवर चढून तीव्र आंदोलन छेडले होते. लेखी आश्वासन देऊनही २० जुलैपर्यंत कनेक्शन मिळाले नाही. त्यामुळे २२ जुलै रोजी त्यांनी पुन्हा जुन्या तहसील कार्यालयाच्या टॉवरवर चढून आत्मक्लेशात्मक आंदोलन सुरू केले.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात स्वतः घटनास्थळी धडकले. त्यांनी वीज वितरण कंपनी व सोलर कंपनीच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून, ताशेरे ओढले आणि अवघ्या ४-५ दिवसांत साहित्य पोहोचवण्याचे लेखी आश्वासन घेतले.
या पाठपुराव्यानंतर केवळ दोनच दिवसांत – २४ जुलै रोजी – सोलर कनेक्शनचे साहित्य प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी पोहोचले. वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता विरेंद्र कळसकर यांनी लवकरच प्रत्यक्ष कनेक्शन देण्याचे संकेत दिले आहेत.
या संपूर्ण संघर्षामध्ये माजी सरपंच व पत्रकार दत्ता उमाळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
या घटनेमुळे शिवसेनेचा शेतकरीहितासाठीचा लढा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी झुंजणारा आमदार कसा असावा, याचे मूर्त उदाहरण म्हणजे सिद्धार्थ खरात!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ग्रामीण भागातील शोषित, अन्यायग्रस्त जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, हे या प्रकरणातून पुन्हा सिद्ध झाले आहे.