राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी– प्रा. दिलीपराव झोटे यांची निवड

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
मिलिंद महाविद्यालयाच्या नागसेन वन परिसरात विद्यार्थीदशेतून आंबेडकरी विचारांचे संस्कार घेणारे, आणि समाजहितासाठी सातत्याने झगडणारे कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण केलेले प्रा. दिलीपराव झोटे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या सामाजिक न्याय विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
हा निर्णय आज संभाजीनगर येथे प्रदेशाध्यक्ष मा. ना. सुनील तटकरे यांच्या हस्ते, खासदार अनंत परांजपे, शिक्षक आमदार विक्रम काळे,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई चाकणकर , जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. सुनील मगरे यांच्या शिफारशीवरून ही निवड करण्यात आली.
प्रा. दिलीपराव झोटे हे विद्यार्थी जीवनातच आंबेडकरी चळवळीतील प्रभावी कार्यकर्ते म्हणून परिचित होते. देऊळगाव राजा तालुक्यातून आलेले ग्रामीण भागातील विद्यार्थी म्हणून त्यांनी नागसेनवन परिसरात अनेक आंबेडकरी उपक्रमांमध्ये भाग घेतला. याच काळात त्यांनी प्रा. सुनील मगरे यांच्यासोबत संघटनात्मक नेतृत्वात मोलाचा वाटा उचलला होता.
आज त्याच जुन्या सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठबळावर, प्रा. झोटे यांना सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश स्तरावरील नेतृत्वाची जबाबदारी मिळाल्याने, चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
या नियुक्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाला विचारप्रधान आणि आंबेडकरी निष्ठेचा नेतृत्व मिळालं असून, हे नेतृत्व राज्यातील ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.