पावसाळ्यात बेडूक, निवडणुकीत जरांगे!” – भाजप आमदार परिणय फुके यांचा सडेतोड हल्ला, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचाही जोरदार पलटवार

नागपूर – मराठा आरक्षणाच्या राजकारणात नव्या वादाचा स्फोट झाला आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी थेट मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुफानी हल्ला चढवला आहे. “पावसाळा आला की बेडूक बाहेर येतात, तसेच निवडणूक आली की जरांगे बाहेर येतात” असा उपरोधिक प्रहार करत फुके यांनी राजकीय वातावरण तापवून टाकले.
फुके यांनी थेट सवाल केला – “जरांगे पाटील यांना खरंच मराठा समाजाला आरक्षण आणि न्याय मिळवून द्यायचा आहे की फक्त समाजात भांडण पेरून स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे? आज ते सतत बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांचा उद्देश मराठा–ओबीसी आणि इतर समाजात फूट पाडून संपूर्ण राज्यात आराजकता पसरवण्याचा आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
दरम्यान, गोवा ओबीसी अधिवेशनातून मनोज जरांगे यांनी केलेल्या ‘मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला’ या गंभीर आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यावर ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जोरदार पलटवार केला आहे. तायवाडे यांनी थेट प्रश्न केला – “कट कुठे रचला? कोणत्या बंद खोलीत झाला? गोवा अधिवेशन बंद दरवाज्यात नव्हते, ते सर्वांसमोर खुले होते. त्यात गोव्याचे मुख्यमंत्री – जे स्वतः मराठा समाजाचे – उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम LIVE होता. मग कट रचण्याचा प्रश्नच येत नाही.”
तायवाडे यांनी जरांगे यांच्या आरोपांना “पूर्णपणे निराधार व नैराश्यातून आलेले उद्गार” ठरवत फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, ओबीसी आणि मराठा समाजातील ऐक्य तोडण्याचा प्रयत्न हा कोणाच्याही फायद्याचा नाही, पण जरांगे यांच्या वक्तव्यांमुळे केवळ अविश्वास व द्वेष निर्माण होतो आहे.
राजकारणात सध्या ‘फुके विरुद्ध जरांगे’ आणि ‘तायवाडे विरुद्ध जरांगे’ अशी दुहेरी लढाई पेटली आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेला वाद आता थेट व्यक्तिगत आणि समाजांतर्गत तणावाच्या स्तरावर गेला असून, पुढील काही दिवसांत हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत.
राजकीय तापमान चढले आहे… आणि संपूर्ण राज्य या नव्या भिडंतीकडे डोळे लावून बसले आहे!