सिंदखेड राजा येथील तहसीलदारांच्या कार्यकाळातील रेती साठा जप्तीबाबत अतिश राजे जाधव यांची चौकशीची मागणी.

सिंदखेड राजा / देवानंद झोटे सिंदखेड राजा तालुक्यात तहसीलदार अजित दिवटे यांच्या कार्यकाळात जप्त करण्यात आलेल्या रेती साठ्याबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात श्रीमंत राजे लखुजीराव जाधवराव गड किल्ले ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रतिष्ठान, अडगावराजा यांच्यावतीने अतिश राजे जाधव व संतोष राजे जाधव यांनी आज उपविभागीय अधिकारी, सिंदखेड राजा यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल 2025 मध्ये जप्त केलेली 140 ब्रास रेती आजतागायत लिलाव किंवा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे महसूल खात्याला आर्थिक तोटा झाला असून, जप्त रेती व वाहनांबाबतची माहिती पारदर्शक न केल्याने शंका निर्माण होत असल्याचे नमूद केले आहे.
निवेदनात जप्त रेतीचा तातडीने लिलाव किंवा वाटप करणे, महसूल खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती सार्वजनिक करणे तसेच या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र समितीकडून करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
हे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे पाठविण्यात आले असून त्याची प्रत आयुक्त अमरावती विभाग, प्रादेशिक महसूल व वन अधिकारी अमरावती, तसेच जिल्हा खनिकर्म अधिकारी बुलडाणा यांनाही देण्यात आली आहे.