औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाची वीजबिलातून मुक्तता:सीएसआर निधीतून सौरऊर्जा निर्मिती यंत्राचे लोकार्पण, महावितरणचे धनंजय औंढेकर यांचा पुढाकार

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे सीएसआर निधीतून सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसविण्यात आले असून आता मंदिराचा परिसर सौर ऊर्जेने उजळून निघणार आहे. या शिवाय संस्थानच्या विज देयकात देखील मोठी बचत होणार आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे श्रावण महिन्यात मोठी गर्दी होते. या शिवाय महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. महाशिवरात्री यात्रा महोत्सवातील रथोत्सव हा धार्मिक कार्यक्रम मुख्य आकर्षण असते. यावेळी सुमारे ७० ते ८० हजार भाविक मंदिर व परिसरात उपस्थित असतात. दरम्यान, मंदिराच्या विद्युत रोषणाईसाठी संस्थानला दरमहिन्याला सुमारे एक ते दिड लाख रुपयांचे विज देयक भरावे लागत होते. संस्थानचा वर्षाकाठी विज देयकावर सुमारे आठरा ते वीस लाख रुपये खर्च होत असल्याचे लक्षात येताच महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी मंदिरावर सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लागणारा निधी एका एजन्सीच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आला आहे. या कंपनीकडून निधी प्राप्त झाल्यानंतर मंदिर व भक्तनिवासाच्या छतावर प्रत्येकी १५ किलो वॅट क्षमतेचे दोन तर तीन किलो वॅट क्षमतेचे एक सौरऊर्जा निर्मिती यंत्र बसविण्यात आले आहे. या सौरऊर्जा निर्मिती यंत्राचे लोकार्पण आमदार संतोष बांगर, महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर,जिल्हाधिकारी राहूल गुप्ता, तहसीलदार हरिष गाडे, वैजनाथ पवार, सुरेंद्र डफळ यांच्या उपस्थितीत झाले. याच मंदीर परिसरात आणखी २० किलोवॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे. त्यामुळे संपूर्ण मंदिर सौरऊर्जेच्या रोषणाईने उजळून निघणार असून मंदिराच्या विज देयकामध्येही मोठी बचत होणार आहे. औंढा नागनाथ येथील मंदिराचे सौरऊर्जीकरण हे अन्य मंदीर व्यवस्थापनासाठी एक आदर्श उदाहरण ठरणार असल्याचे बोलले जात आहे.