महाराष्ट्र
शनि शिंगणापूरमध्ये भाविकांना चौथऱ्यावर प्रवेशबंदी:शनि अमावास्येच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा मोठा निर्णय, भाविकांना समोरूनच दर्शन

- महाराष्ट्राचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या शनि शिंगणापूर येथील शनि मंदिरात येत्या शनि अमावास्येनिमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी शनि अमावास्या आणि श्रावण महिना समाप्ती होत असल्याने, सुरक्षेच्या कारणास्तव शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे दोन दिवस चौथऱ्यावर जाण्यास भाविकांना प्रवेशबंदी असणार आहे. शनिशिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान विश्वस्त मंडळ आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठकी नुकतीच पार पडली. शनि अमावास्या, श्रावण समाप्ती आणि सलग सुट्या यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक येथे दाखल होणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या. गर्दीचे नियोजन आणि भाविकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शनि चौथऱ्यावर जाऊन तेल अभिषेक करण्यास मनाई उपाय आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी सकाळी 11.35 वाजेपर्यंत शनि अमावास्या असल्याने यात्रा भरणार असून, पोलिस निरीक्षक अशीष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी झाली आहे. तेलाभिषेकाऐवजी चौथऱ्यासमोरून दर्शन दरवर्षी शनी अमावास्येला देश-विदेशातून लाखो भाविक शनिशिंगणापुरात येतात. शनिचौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक करण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन भाविकांची सुरक्षितता आणि दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीच्या महाआरतीपूर्वीपासून ते शनिवारी संध्याकाळच्या आरतीपर्यंत चौथऱ्यावरचा तेलाभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांनी चौथऱ्यासमोरून शांततेत दर्शन घ्यावे, असे विश्वस्त मंडळाने आवाहन केले आहे. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले तेल अभिषेक बंद असला तरी, भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिराचे दरवाजे मात्र अखंड खुले ठेवण्यात आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार असून, भाविकांना शनिदर्शनाचा लाभ घेता येईल. हे ही वाचा… पुण्यात मुठा, इंद्रायणी नद्या दुथडी भरून:एकता नगरला पुराचा विळखा, NDRF कडून बचावकार्य सुरू; नागरिकांना सतर्कतेचा इशारा मागील दोन दिवसांपासून पुणे परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शहरासह घाटमाथ्यावर सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठा पाणीसाठा जमा झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खडवासलामधून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे पाणी सोडल्याने पुण्यातील एकतानगर परिसरात मुठा नदीचे पाणी घरांमध्ये घुसले असून, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. दुसरीकडे देवाच्या आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आला असून, प्रशासनाकडून जुना पूल आणि इंद्रायणीच्या घाटावर भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. सविस्तर वाचा…