जिल्हा परिषदेच्या पत्रानंतर सय्यद इरफान यांचे उपोषण स्थगित! ११ वी विज्ञान अतिरिक्त तुकडीसाठी आंदोलनाला तात्पुरती स्थगिती

बुलडाणा /प्रतिनिधी: जिल्ह्यातील देऊळघाट येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इयत्ता ११ वी विज्ञान शाखेची केवळ एकच तुकडी मंजूर असल्याने शाळेतून १० वी उत्तीर्ण झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून अतिरिक्त तुकडीच्या मागणीसाठी स्थानिक पातळीवर हालचाली सुरू झाल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व दैनिक सायरन चे जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान सय्यद अख्तर यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी निवेदन देत अतिरिक्त तुकडी मंजुरीची मागणी केली होती आणि दि. १४ ऑगस्टपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला होता.
मात्र, त्यानंतर दि. १३ ऑगस्ट रोजीच जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त झाले. प्राचार्य आर. आर. सय्यद यांच्यामार्फत इयत्ता ११ वी विज्ञान (उर्दू माध्यम) अतिरिक्त तुकडीसाठी प्रस्ताव दाखल करून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली.
या घडामोडींचा मान राखून सय्यद इरफान यांनी आपले दि. १४ ऑगस्टचे नियोजित उपोषण तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली आहे. मात्र, लवकरच अतिरिक्त तुकडीला मान्यता न मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
सध्या देऊळघाट शाळेतून 164 विद्यार्थी १० वी उत्तीर्ण झाले असून फक्त ६० विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेत प्रवेश मिळाला आहे. उर्वरित विद्यार्थी, विशेषतः गरीब कुटुंबातील व मुलींचा मोठा वर्ग, प्रवेशापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने अतिरिक्त तुकडीला मान्यता द्यावी, अशी मागणी पालक, गावकरी व समाजघटकांकडून होत आहे.