कूडो राज्यस्तरीय स्पर्धेत आयुष गवईचा झंझावात; बुलडाणा-जालना दोन्ही जिल्ह्यांचा गौरव

बुलडाणा / बाबासाहेब सरकटे– कूडो असोसिएशन महाराष्ट्र तर्फे आयोजित राज्यस्तरीय कूडो चॅम्पियनशिप २०२५ मध्ये बुलडाणा जिल्ह्याचा आयुष गौतम गवई याने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले. अवघ्या सातवीत शिकणाऱ्या या छोट्या खेळाडूने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्य पदक आपल्या नावे केले. त्याच्या या यशामुळे बुलडाणा व जालना या दोन्ही जिल्ह्यांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
आयुष हा मूळ बुलडाणा जिल्ह्यातील असून त्याचे आई-वडील शिक्षक व्यवसायात आहेत. त्यांचा कामानिमित्त जालना जिल्ह्यातील वास्तव असल्याने आयुषचे बालपण जालन्यातच गेले आहे. सध्या तो पोद्दार इंग्लिश स्कूल, जालना येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. शैक्षणिक अभ्यासाबरोबरच कूडो खेळातही तो उज्वल कामगिरी करत आहे.
या राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये राज्यभरातून अनेक ताकदवान खेळाडूंनी सहभाग घेतला होता. आयुषने आपली जिद्द, वेग, कौशल्य आणि आत्मविश्वास दाखवत उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आणि थेट अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात त्याने आक्रमक झुंज दिली, परंतु अनुभवी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध थोडक्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले.
आयुषच्या या यशामध्ये प्रशिक्षक दत्ता पवार सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आयुषने आपल्या कौशल्यात आणखी धार आणली आणि राज्यस्तरावर आपली छाप उमटवली.
आयुषच्या या यशामुळे बुलडाणा आणि जालना या दोन्ही जिल्ह्यांचा क्रीडा क्षेत्रातील मान उंचावला आहे. स्थानिक पातळीवर त्याच्या कामगिरीचे कौतुक होत असून अनेकांनी त्याला भविष्यातील “सुवर्णवीर” म्हणून गौरवले आहे. “आयुष हा मेहनती, शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासू विद्यार्थी आहे. लहान वयातच त्याने राज्यस्तरीय पातळीवर आपली छाप पाडली आहे. भविष्यात तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच चमकेल,” असा विश्वास त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे.
कूडो हा कराटे प्रकारातील खेळ असून त्यासाठी शारीरिक ताकद, वेग, मानसिक संतुलन आणि धैर्य या सर्वांचा कस लागतो. या खेळात आयुषने लहान वयातच प्राविण्य मिळवून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
त्याच्या या यशामुळे बुलडाणा व जालना जिल्ह्यांत आनंदाचे वातावरण असून शाळा प्रशासन, शिक्षकवर्ग, सहाध्यायी विद्यार्थी, पालक आणि स्थानिक नागरिकांनी त्याचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. आगामी काळात आयुष गवईने सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी सर्वत्र अपेक्षा व्यक्त केली जात आहे.