गारखेड येथील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा मुद्दा पेटला; कुटुंबांनी अन्नत्याग आंदोलनाचा दिला इशारा

सिंदखेड राजा/ रामदास कहाळे गारखेड येथील प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता येथील रहिवाशांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची सुरुवात दि. ११-०९-२०२५ रोजी होणार असल्याचे एका निवेदनाद्वारे प्रशासनाला कळवण्यात आले आहे.
गारखेड येथील रहिवासी रामप्रसाद गणेशराव लोहकरे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १९७० मध्ये घारखेड येथे बांधलेल्या मोठ्या प्रकल्पात वार्ड क्र. ३ मधील सुमारे १०० घरे बाधित झाली होती. या प्रकल्पाच्या बांधकामामुळे अनेक कुटुंबांचे स्थलांतर झाले असले तरी, या वार्डमधील बाधित कुटुंबांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही.
निवेदनानुसार, प्रकल्पग्रस्तांना दिलेले स्थलांतरित जागांचे भूखंड हे मोकळ्या जागेवर नसून, ते गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या शिवरात शिरनेर येथे आहेत. या भूखंडांचे पुनर्वसन न झाल्यामुळे आतापर्यंत ६ ते ७ वाळलेल्या बोरीच्या झाडांच्या आणि काट्याच्या झुडपांमुळे त्यांना तिथे जाणे शक्य होत नाही. गेल्या ५० वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून, यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. या प्रकल्पातून पाण्याचे लिकेज होत असल्यामुळे पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांनी प्रशासनाला तात्काळ लक्ष देण्याची विनंती केली आहे. अन्यथा, येत्या काही दिवसांत म्हणजे ११ सप्टेंबर २०२५ पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येईल आणि यातून निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मकरंद पाटील आणि विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे यांनाही पाठवण्यात आली आहे.